शरीरातील अँटीबॉडीज सक्रिय झाल्यावर रुग्णसंख्या आटोक्यात - डॉ. भरत जगियासी मुंबई : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक इतरांच्या संपर्कात येऊ नयेत याची काळजी घेतली जाते. त्यासाठी अशा रुग्णांना क्वारंटाईन केले जाते. गेल्या तीन वर्षात एकूण १ कोटी १० लाख ७७ हजार ९३२ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आजही जे रुग्ण आढळून येत आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांपैकी ६० टक्क्याहून अधिक नागरिक हाय रिस्क गटामधील आहेत.
संपर्कात आलेले लोक क्वारंटाईन :जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूने मुंबईवर मार्च २०२० मध्ये हल्ला केला. पाहता पाहता काही दिवसात हा विषाणू सर्वत्र पसरला. रुग्णसंख्या वाढू लागली त्याच सोबत मृत्यू होऊ लागले. यामुळे सरकाराच्या आदेशाप्रमाणे मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या माध्यमातून त्याचा प्रसार होऊ नये म्हणून अशा लोकांना क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली. त्यासाठी पालिकेने कोविड सेंटर सुरु केली आहे. नागरिकांना विभागात क्वारंटाईन करता यावे म्हणून शाळा, सभागृह आदी जागा ताब्यात घेण्यात आल्या होत्या. सध्या गंभीर नसलेल्या रुग्णांना आणि संपर्कात आलेल्या लोकांना घरातच होम क्वारंटाईन केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
१ कोटी नागरिक क्वारंटाईन :मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण ११ लाख ६० हजार १०३ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण १ कोटी १० लाख ७७ हजार ९३२ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यात ६५ लाख ९० हजार ३५८ हाय रिस्क असलेले तर ४४ लाख ८७ हजार ५७४ लो रिस्क असलेले लोक आहेत. एकूण त्यापैकी १ कोटी १० लक्ष ६५ हजार ९७७ लोकांनी क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. १३ एप्रिल या एकाच दिवशी १६४५ लोकांचा शोध घेण्यात आला. त्यात १११३ हाय रिक्स तर ५३२ लो रिस्क लोक आहेत. मुंबईत सध्या १६३५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात १५१५ लक्षणे असलेले तर ११८ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. यातील २ रुग्ण गंभीर आहेत.
मुंबईत २८४ नवे रुग्ण :मुंबईत बुधवारी ३२० रुग्णांची, गुरुवारी घट होऊन २७४ रुग्णांची तर शुक्रवारी २८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी २ मृत्यूची, गुरुवारी शून्य तर शुक्रवारी १ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात बुधवारी ९ तर शुक्रवारी ४ मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या १६४३ सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत एकूण ११ लाख ६० हजार १०३ रुग्णांची तर १९ हजार ७५३ मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या रुग्णालयात ११८ रुग्ण दाखल असून ४२ रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
तर मृत्यू रोखता येतील :मुंबईमध्ये रोज २०० हुन अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तसेच रुग्णांच्या मृत्यूची संख्या कमी आहे. गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र त्यामधील रुग्णालयात दाखल करावे लागेल अशा रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे भीतीचे कारण नाही. नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत. ज्यांना गंभीर आजार आहेत अशा रुग्णांनी वेळेवर उपचार करून घ्यावेत. असे आजार असलेले रुग्ण शेवटच्या क्षणी पालिका रुग्णालयात येतात. यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
'तो' पर्यंत रुग्ण वाढणार :कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. लसीकरण दरम्यान नागरिकांना दोन लसीचे डोस देण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच जेष्ठ नागरिकांना बूस्टर डोसही देण्यात आला. याला आता दीड वर्ष होऊन गेली आहेत. यामुळे नागरिकांच्या शरीरामधील अँटीबॉडीज चे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे पुढील काही दिवस रुग्णसंख्या वाढत राहील. नागरिकांच्या शरीरातील अँटीबॉडीज सक्रिय झाल्यावर रुग्णसंख्या आटोक्यात येईल अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन या संस्थेच्या मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी दिली.
हेही वाचा - Hapus Mangoes : हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक; 'असा' ओळखा ओरिजनल हापूस