मुंबई -मुंबईत एका व्यक्तीकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी नरेंद्र जवाहर सिंग नावाच्या २५ वर्षीय आरोपीला अटक केली असून दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीसीपी सोमनाथ घार्गे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलजवळ एक व्यक्ती देशी बनावटीचे पिस्तूल विकण्यासाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत आरोपीची वाट पाहत होते. आज (रविवारी) सकाळी ८:३० च्या सुमारास एक २५ वर्षीय व्यक्ती संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलीस त्याच्याकडे गेले असता, आरोपीने संधी पाहून पळायला सुरुवात केली. पोलिसांनी काही अंतरावर धाव घेत आरोपीला पकडले आणि त्याच्याकडून पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केले. यासंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहे.