मुंबई- बॉलीवूड अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाकडून (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) तपास केला जात आहे. दरम्यान मंगळवारी (दि. 8 डिसें.) रिगल महाकाला या अमली पदार्थ तस्कराला एनसीबीने अटक केल्यानंतर त्याच्याकडून चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुंबईतील अंधेरी, ओशिवरा या परिसरामध्ये छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ व रोकड जप्त करण्यात आली असून एनसीबीने मोहम्मद अजम जुमान शेख यास पाच किलो चरससह अटक केली आहे.
13 लाख 51 हजारांची रोकडही जप्त
अटक करण्यात आलेल्या आरोपी मोहम्मद अजम जुमान शेख यांच्याकडून पाच किलो चरससह तब्बल 13 लाख 51 हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. ओशिवरा परिसरातील मिल्लत नगर येथे ही कारवाई करण्यात आली आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर तिला जामीन मिळाला असला तरी तिच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात एनसीबीकडून तपास केला जात होता. त्या तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.