मुंबई -ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन बनावट मोबाईल अॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केल्याचे भासवून लाखो रुपयांचे सोने लुबाडणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली. निखिल दुर्गेश सुमन (वय-26) या आरोपीचे नाव आहे. मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेने निखिलवर कारवाई केली.
मागील काही महिन्यांपासून आरोपी वेगवेगळ्या ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन आपण मोठा बांधकाम व्यावसायिक असल्याचे सांगत. घरात लग्नकार्य असल्याने सोन्याचे दागिने विकत हवे असल्याचे दुकानदारांना भासवत असे. सोन्याचे दागिने घेतल्यावर पैसे मोबाईलमधील बँक पेमेंट अॅपच्या माध्यमातून पैसे पाठवल्याचा स्क्रीन शॉट दुकानदारांना दाखवत असे. तुमच्या बँकेचे सर्व्हर डाऊन असून माझ्या खात्यातून वजा झालेले पैसे तुमच्या खात्यात येण्यास वेळ लागेल, असे सांगत निखील सुमन सांगत असे. त्यानंतर सोने घेऊन निघून जात असे. आरोपी निखिल सुमन हा प्रत्येक वेळी वेगळा मोबाईल क्रमांक दुकानदारांना देत होता.