मुंबई -गोवंडी परिसरातून बनावट टेलिफोन एक्स्चेंज चालवणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या गुप्त माहितीवरून शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आरोपीकडून पोलिसांनी 223 सिमकार्डसह पाच सिमबॉक्स तसेच कॉल करण्यासाठी वापरण्यात येणारे टेलिफोन एक्स्चेंज साहित्य हस्तगत केले आहे.
संबंधित आरोपी जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्करा संदर्भातील हालचालींची गुप्त माहिती फोनवरून देत होता. परदेशातून येणारे व्हीआयपी कॉल्स अनधिकृतपणे 'सिम बॉक्स' कार्यप्रणालीद्वारे एअरटेल कंपनीच्या दोन भारतीय मोबाईल क्रमांकावर येत होते. यामध्ये देशातील वेगवेगळ्या ठिकाणांवर फोन येत होते.
गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी या संदर्भात दोन पथके स्थापन केली होती. या प्रकरणात आरोपी प्रीपेड कार्डचा वापर करत होते. हे दोन्ही मोबाईल क्रमांक मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील आढळून आले. त्यानंतर या क्रमांकावर सर्वाधिक आऊटगोइंग कॉल तसेच इन्कमिंग एसएमएस असल्याचे आढळून आले होते. या दरम्यान गोवंडीतील शिवाजीनगर भागात नटवर पारेख कम्पाऊंडमध्ये संबंधितांचे एक्स्चेंज लोकेशन ट्रॅक झाले. पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी छापा मारला.यावेळी समीर कादर अलवारी या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर यापूर्वी देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यासह अन्य पाच आरोपावर देखील अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे.