ठाणे - स्मशानभूमीच्या देखभालीचे टेंडर मिळवून ( Crematorium Tender ) देण्याचे आमिष दाखवत एकाने ७१ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भा.दं.वि.चे कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सोहेल सईद बुरहान (वय २८ वर्षे, रा.कौसा, मुंब्रा), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
टेंडरमध्ये मोठा आर्थिक फायदा असल्याचे दाखवले आमिष -कल्याण पश्चिम भागातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५४ वर्षीय तक्रारदार महिला राहते. त्यांचा वॉटर सप्लायचा व्यवसाय असून त्यांची २०१७ पूर्वी सोहेलशी ओळख झाली होती. त्यानंतर सोहेलने विश्वास संपादन करून तक्रारदार महिलेला नवीमुंबई महापालिका हद्दीतील स्मशानभूमीच्या देखभालीचे टेन्डरमध्ये भागीदार करण्याचे व त्यातून मोठा आर्थिक फायदा असल्याचे आमिष दाखवले. या अमिषाला बळी पडून तक्रारदार महिलेने २७ जुलै, २०१७ ते २८ मे, २०१९ दरम्यान भागीदार म्हणून सोहेलला टेंडर मिळवून देण्यासाठी ७१ लाख १५ हजार रुपयांची रक्कम दिली.