मुंबई- खंडणी मागणाऱ्या व ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत आरोपीस गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने अटक केली आहे. २५ मे रोजी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलच्या मॅनेजरला एका व्यक्तीने २५ हजार रुपयांची खंडणीची मागणी करत शिवीगाळ केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबत पवई पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
ओळख लपवून खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांकडून बेड्या - Anubhav Bhagwat
खंडणी मागणाऱ्या व ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत आरोपीस गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने अटक केली आहे.
याचा तपास गुन्हे शाखा कक्ष १० कडे सोपविण्यात आला होता. त्यानुसार खबऱ्या आणि तांत्रिक तपास करत आरोपीचा शोध सुरु केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी स्वतःची ओळख लपवून बसला होता. २६ मे रोजी कक्ष १० च्या पोलिसांना आरोपी मरोळ परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यानुसार त्याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत अटक केली. या आरोपीचे नाव सचिन उर्फ बाबू शंकर मोहिते (वय 37 वर्षे) याच्याविरोधात खंडणी, खून, मारहाण आणि दंगलीचे किमान ५ गुन्हे पवई पोलीस ठाण्यात नोंद आहेत.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त भूषण राणे आणि कक्ष १० चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.