मुंबई -आज पहिला श्रावणी सोमवार तसेच नागपंचमी असा दुग्ध शर्करा योग् आहे. त्यामुळे मुंबईच्या बाबूलनाथ मंदिरात पहाटेपासून शेकडो भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. पहाटे प्रकाल पूजा, रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर सहा वाजता आरती झाली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिराचा गाभारा खुला करण्यात आला.
श्रावण मासात व्रत वैकल्य आणि धार्मिक पूजा पाठाचा उत्सव केला जातो. या महिन्यात महादेवाचे भक्त महादेवाला उपासवारी करत असतात. आजपासून श्रावण महिन्याला सुरवात झाली आहे. पवित्र मानला जाणाऱ्या श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार आहे. त्यामुळे शिवभक्तांनी मुंबईतील बाबुलनाथमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दरवर्षी देखील याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक-भक्त येत असतात. विशेष म्हणजे नागपंचमी व श्रावणी सोमवार एकाच दिवशी असल्याने आजच्या दिवसाला अधिक महत्व आहे.
बाबूलनाथ हे मुंबईतील सर्वात सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे. हे मंदिर १२ व्या शतकात राजा भीमदेव यांनी बांधले आहे. मरिन लाईन्स जवळील लहान टेकडीवर हे मंदिर आहे. मात्र, आजूबाजूला असलेल्या उंचचउंच इमारतींमुळे हे मंदिर दुर्लक्षीत झाले आहे. हे मंदिर जमीनदोस्त झाले होते. मात्र, १७८० साली या मंदिराचे काही अवशेष सापडल्याने मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.