मुंबई: भाजपाचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे (Late BJP leader Gopinath Munde) यांची आज जयंती, (Birth Anniversary OF Gopinath Munde ) या निमित्ताने गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपा नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) तसेच मुंडे कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्या अर्धातासाचे मौन बाळगणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरुषांचा अवमान होत असून त्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून हे मौन बाळगणार असल्याची त्यांनी माध्यमाला बोलताना दिली. हजारो चाहते या निमित्ताने गोपीनाथ गडावर जाऊन अभिवादन करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.पाहूया गोपीनाथ मुंडेंचा प्रवास.
अध्यात्मिक वारसा व शालेय जीवन : गोपीनाथ मुंडे म्हणजे राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना, राजकारणात शिखर गाठणारा अद्वितीय नेता. गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म १२ डिसेंबर १९४९ बीड जिल्ह्यातील परळी तालुक्या तील नाथरा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडे हे वारकरी होते. आई आणि वडिलांसोबत मुंडे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी पासून अनेक वर्षे पंढरपूरची वारी केली.त्यांच्या मनावर बालपणापासूनच आध्यात्मिक प्रभाव राहिला. त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. १९६९ मध्ये त्यांचे पितृछत्र हपरले; पण आई व थोरले बंधू पंडितअण्णा यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. भाऊ पंडितअण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण पूर्ण केले. गोपीनाथ मुंडे यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले आणि शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी अंबाजोगाई गाठले. मुंडे यांच्या राजकीय प्रवासाला सुरवात झाली ती महाविद्यालयीन जीवनात. महाविद्यालयात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ते किंग मेकर ठरायचे.
प्रमोद महाजन यांचे मेहुणे: गोपीनाथ यांच्याशिवाय पांडुरंग मुंडे यांना दोन मुले होती. गोपीनाथ मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नाथरा येथेच झाले. यानंतर त्यांनी अंबेजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यांचा विवाह २१ मे 1978 रोजी प्रमोद महाजन यांच्या भगीनी प्रज्ञा महाजन यांच्यासोबत झाला. आणि मुंडे हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे मेहुणे झाले. त्यांच्या कुटुंबात पंकजा पालवे, डॉ. प्रीतम माटे आणि यशश्री मुंडे या तीन मुलींचा समावेश आहे. आमदार धनंजय मुंडे हे भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. राजकारणी पंडित अण्णा मुंडे हे भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांचे मोठे बंधू आहेत.
महाजन मुंडे मैत्री : अंबाजोगाईला त्यांची प्रमोद महाजन यांच्याशी भेट झाली. प्रमोद महाजन यांनी गोपीनाथ मुंडेंचे नेतृत्व गुण ओळखले. आणि त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले. मुंडे-महाजन यांचं मैत्रीपर्व महाविद्यालयात सुरू झाले. आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ही मैत्री जपली. मुंडे-महाजन जोडीने महाराष्ट्रात भाजपचे पाय पक्के रोवले. भाजपचा वटवृक्ष केला. महाविद्यालयीन काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाचे प्रार्थमिक धडे गिरवले. जनसंघामध्ये असतांना त्यांनी समाजकारण आणि राजकारण यांची मोट बांधायला सुरुवात केली. जनसंघातून भाजप वेगळा झाला.आणि गोपीनाथ मुंडेंच्या कारकिर्दीनं वेग घ्यायला सुरवात केली.
आणिबाणीत भोगला तुरुंगवास : मुंडे यांनी आणिबाणीला विरोध केला आणिबाणीतल्या तुरुंगवासात यशवंत केळकर यांच्यासारख्या संघटकाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता युवा मोर्चामधून राजकारणात प्रवेश केला. १९७८ मध्ये गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातल्या उजनी गटातून जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले. १९८० मध्ये रेणापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळूण बघितलं नाही.