महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या दिवशी विधानभवनात रंगली नागालँडच्या राजकीय समीकरणाची चर्चा.. - एकनाथ शिंदे

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या ४० बंडखोर आमदारांवर प्रत्येकी ५० कोटींचा (खोके) आरोप होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये एनडीपीपीला समर्थन दिल्याप्रकरणी आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याची चर्चा सर्वत्र होत आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आवारात सुद्धा दिवसभर हीच चर्चा रंगली होती.

Maharashtra Budget 2023
नागालँडच्या राजकीय समीकरणाची चर्चा

By

Published : Mar 9, 2023, 4:52 PM IST

मुंबई :नागालँडमध्ये एनडीपीपीला भाजपने समर्थन दिल्यानंतर त्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा समर्थन दिले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत गेली अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. याबाबत बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, शरद पवार यांच्याबद्दल नेहमी बोलले जाते की, शरद पवार बोलतात एक आणि करतात एक. नागालँडमध्ये भाजप आणि इतर पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ही आता सहभाग दर्शवला आहे. भाजप बरोबर गेल्याने आम्हाला नाव ठेवत असताना आता आम्ही राष्ट्रवादीला ५० खोके नागालँड ओके असे म्हणायचे का? महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते असतील जे आमच्यावर आरोप करत होते. ते ज्या घोषणा द्यायचे त्या घोषणा प्रत्यक्षात आणण्याचे काम आता शरद पवार करत आहेत, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला आहे.



सर्वस्वी शरद पवारांचा निर्णय: नागालँडमध्ये एनडीपीपी सोबत गेलेल्या भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे यांनी तिथे सरकार स्थापन केले. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गरजही नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एनडीपीपी पाठिंबा देत ते सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे नागालँडमध्ये आता भाजपसोबत राष्ट्रवादीची युती सहभागी झाली असल्याने राजकीय वर्तुळात नवीन समीकरणे होताना दिसत आहेत. या नव्या समीकरणावर बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अगदी कमी शब्दात प्रतिक्रिया देताना, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. म्हणून ते योग्य निर्णय घेतील, असे म्हंटले आहे.



आमदारांना ५० खोक्यांपेक्षा जास्त खोके?: नागालँड मधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची चर्चा विधानभवनाच्या परिसरात सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी याबाबत बोलताना ते भाजप सोबत गेले नसून, त्यांनी एनडीपीपीला समर्थन दिल्याचे सांगितले आहे. या मुद्द्यावर आता शिंदे गटाच्या आमदारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर निशाणा साधला जात आहे. आम्हाला ५० खोके म्हणून हिनवणारे आता किती खोके घेऊन बसले आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी तर नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना ५० खोक्यांपेक्षा जास्त खोके भेटल्याचे सांगितले आहे. तसेच विधानसभेच्या ६० जागा असलेल्या नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीत एनडीपीपीने २५ जागा जिंकत नंबर १ चा पक्ष राहिला. तर भाजप १२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागा जिंकल्या आहेत.

हेही वाचा : Maharashtra Budget 2023 आता एसटीने कधीही कुठेही फिरा फक्त हाफ तिकीटामध्ये महिलांसाठी खास घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details