बकरी ईदला कुर्बानी करण्याची सुट देण्यात यावी; माजी मंत्री नसीम खान यांची मागणी
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी सरकारने दिली आहे, त्याप्रमाणे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी, माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.
मुंबई -देशात १ ऑगस्ट रोजी येणारा मुस्लीम समाजाचा खूप महत्वाचा सण ईद ऊल अदाह (बकरी ईद) असून या दिवशी राज्यातील मुस्लीम समाजाला कुर्बानी देण्याची सूट देण्यात यावी आणि त्यासाठी शासनाने निर्णय जारी करावा, अशी मागणी माजी मंत्री व कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांना पत्र लिहून केली आहे.
मुस्लीम समाजाचा रमजाननंतर महत्वाचा सण हा बकरी ईद असतो. यादिवशी कुर्बानी करणे अनिवार्य (वाजिब) असते. दरवर्षी मोठ्या हर्षोल्हासात संपूर्ण जगात हा सण मुस्लीम बांधव साजरा करीत असतात. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी घोषित केल्याने अनेक सण व धार्मिक उत्सव साजरे करता आले नाही. असे असतानाही कोविड काळात काही शर्तींच्या आधारावर गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर बकरी ईद या मुस्लीम समाजाच्या महत्वाच्या सणाविषयी आत्तापर्यंत शासनाकडून कोणताही निर्णय झाला नाही. यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यातील मुस्लीम समाज व मुस्लीम संघटना सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नसीम खान यांनी पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, या संदर्भात आज (दि.14 जुलै) सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बकरी ईदच्या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडत आहे या बैठकीत ही बकरी ईद साजरी करण्यासाठी कुर्बानी करण्याची सूट देण्यात यावी यासाठीच हा निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.