मुंबई - २१ तारखेला मुंबईत 'ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा आणि लोकशाही वाचवा', असा सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक घरातून बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्यासाठी एक फॉर्म भरुन घेण्यात येणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे सर्व विरोधीपक्षीय पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या फॉर्म्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावना जाणून घेण्यात येणार आहेत. आणि त्यानंतर २१ ऑगस्टला निघणाऱ्या मोर्चात राज्यातील हे सर्व फॉर्म महाराष्ट्र निवडणुक आयोगाने याचा विचार करावा, म्हणून त्याच्याकडे सादर करण्यात येतील. असे राज ठाकरे यांनी सांगितेले. तसेच या मोर्चामध्ये कोणताही राजकीय पक्षाचा झेंडा राहणार नाही, असे राज यांनी स्पष्ट केले. जनता ही सार्वभौम असून आमची ही फक्त सुरुवात आहे. या लोकसभा निवडणुकीत जे जिंकले त्यांच्यासोबत जे हरले त्यांनाही धक्का बसला, असेही यावेळी राज यांनी सांगितले.
तसेच कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या प्रश्नावर बोलताना राज म्हणाले की, भाजपाचे प्रथम लक्ष हे केंद्रात सत्ता स्थापन करणे होते, आणि म्हणूनच त्यांनी त्यावेळी तसा भास निर्माण केला होता.
गेल्या लोकसभा निवडणुकीत ३७१ मतदार संघांमध्ये ५५ लाखांहून अधिक मंतांचा गोंधळ झाला होता. मुख्यमंत्र्यांना विश्वास असेल तर त्यांनी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यास सहमती दर्शवावी, असे आवाहनही त्यांनी केले. ममता बॅनर्जी यांची भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले की, ममतांनी याबाबत सहमती दर्शवली असुन तुम्ही तुमच्या राज्यात काम करा, आम्ही आमच्या राज्यात काम करतो, असे सांगितले.