मुंबई - येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असलेल्या हिमालय पुलाच्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मुंबईमधील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले. त्यात मुंबईमधील तब्बल २१ पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. यापैकी पश्चिम उपनगरातील सहा पुलांचे बांधकाम ऑक्टोबरपासून केले जाणार आहे. इतर पुलांबाबत अद्याप निर्णय अजून आला नाही.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी पूल कोसळल्यामुळे पालिकेने सर्व पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ३७४ पैकी २७६ पुलांचे ऑडिट करण्यात आले. आणि त्यात १८ पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. ८ धोकादायक पूल पालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने पाडले आहेत. पालिकेच्या पूल विभागाने पश्चिम व पूर्व उपनगरातील अनुक्रमे १५७ व ६६ पुलांचे ऑडिट करण्यात केले आहे. नव्या झालेल्या ऑडिटनुसार एकूण १५ धोकादायक पूल वाढले असून एकूण धोकादायक पुलांची संख्या २१ वर गेली आहे.
मुंबई महापालिकेकडून गोरेगाव ते कांदिवलीमधील पाडण्यात येणार्या कांदिवली येथील विठ्ठल मंदिर इराणीवाडी, एसव्हीपी नगर रोड कृष्णकुंज, आकुर्ली रोड, तर गोरेगाव येथील वालभाट नाला, मालाड येथील एस. व्ही. रोड बाटा शोरूम येथील पुलांचे बांधकाम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. या पुलांचे बांधकाम दोन वर्षात केले जाणार आहे. त्यासाठी पालिका २७ कोटी रुपये खर्च करणार आहे. इतर धोकादायक पुलांबाबत अद्याप निर्णय झाला नसून पावसाळ्यात हे पूल बांधणे शक्य नसल्याने आता पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबरनंतर या पुलांचे बांधकाम सुरु केले जाऊ शकते अशी शक्यता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अजूनही मुंबईकरांना या धोकादायक पुलावरून आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे.