मुंबई - पेगासस फोन प्रकरण तापणार असल्याची चिन्हे दिसत आहे. या प्रकरणी आता इस्रायलमध्ये गेलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. तसे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. चौकशीमुळे प्रकरणातील धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.
राजकारण्यांसह पत्रकार, उद्योजक व इतर काही व्यक्तींचे मोबाईल पेगासस स्पायवेअरद्वारे हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतात खळबळ उडाली आहे. मोदी सरकारही पेगासिस प्रकरणावरून अडचणीत आले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रातही या स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी झाल्याचा दावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोन टॅप झाल्याचे म्हटले. हे प्रकरण २०१७-१८ मधील असल्याचे ते म्हणाले.
काही अधिकारी रडारवर -
संसदीय अधिवेशनातही विरोधकांनी महाराष्ट्रातील नेत्यांचे फोन टॅप झाल्याचा दावा करत मोदी सरकारची कोंडी केली. आता 2019मध्ये फडणवीस सरकार काळात राज्य शासनातील काही अधिकारी निवडणूक निकाल लागल्यानंतर इस्त्रायलला गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा वाद चिघळला आहे. हे अधिकाऱ्यांना का आणि कशासाठी इस्त्रायल पाठवले होते? कोणी पाठवले होते? याची सविस्तर चौकशी करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रशासनाला दिल्याचे समजते. फडणवीस सरकार काळातील प्रकरण असल्याने फडणवीस देखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.