मुंबई :गेल्या आठवड्यात सीएसएमटी रेल्वे स्थानकात एका विद्यार्थिनीवर झालेल्या अतिप्रसंगानंतर पुन्हा रेल्वेच्या महिला सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत. अशा प्रकारची एखादी घटना घडल्यानंतरच लोकलमध्ये सुरक्षा वाढवली जाते. मग नंतर जैसे थे परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे बऱ्याच महिला प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसत आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून महिला डब्यात पोलीस आणि आरपीएफच्या जवानांची वेळ वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. सध्या महिला डब्यात रात्री साडेआठपासून ते सकाळी सहापर्यंत जवान तैनात असतात. मात्र, सकाळी सीएसएमटी आणि चर्चगेट वरून सुटणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात पोलीस तैनात नसल्याने अशा घटनांना वाव मिळत आहे. त्यामुळे महिला लोकल डब्यात सकाळी नऊपर्यंत पोलीस तैनात करण्याची मागणी केली जात आहे.
रात्री उशिरा महिला लोकलमधून करतात प्रवास :गेल्या बऱ्याच वर्षांपासून महिला देखील उशिरा कार्यालयांमध्ये काम करतात त्याचप्रमाणे महिलांना नाईट ड्युटी देखील करावी लागते. त्यामुळे रात्री उशिरा लोकलमधून महिला प्रवास करतात. रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यात पोलीस कर्मचारी तैनात असतो. स्टेशनवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासन महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध पावले उचलत आहे. असे असूनही रेल्वे प्रवासादरम्यान विनयभंग, बलात्कार आणि छेडछाड असे गुन्हे घडत असल्याने महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
महिलांच्या विरोधातील गुन्हे रोखण्यात अपयश :रेल्वे पोलिसांनी साडेपाच महिन्यात 46 गुन्ह्यांपैकी 44 गुन्ह्यांचा तपास केला. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेकडून विविध उपाय केले जात असताना देखील रेल्वे प्रशासन किंवा लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून महिलांच्या बाबतीतील गुन्हे रोखण्यासाठी अपयशच येत आहे. लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांची छेडछाड विनयभंग तसेच बलात्काराच्या घटनांना महिलांना सामोरे जावे लागत आहे.