मुंबई -कोरोना महामारीमुळे लोकांचा दिनक्रम बदलला आहे. कोरोना संसर्गामुळे शाळा, मैदानी खेळ बंद झाले आहेत. त्यात बैठक जीवनशैलीमुळे लहान मुलांमध्ये शारीरिक, मानसिक बदल होत आहेत. मुलांचा बदललेला आहार आणि दिनक्रम यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलांमध्ये आलेल्या शिथिलतेमुळे स्थूलतेची समस्या वाढत आहे.
मुलांमधील स्थूलतेची लक्षणे -
मुलाचे वय आणि उंचीच्या गुणोत्तरानुसार आवश्यक वजनापेक्षा साधारण १० ते १५ किलो वजन अधिक असणे म्हणजे मूल स्थूलतेकडे झुकत आहे, असे म्हणता येईल. घरी बसल्या बसल्याही हालचाली संथ होणे, मैदानी खेळ न खेळणे, वजन सतत वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे ही साधारण लक्षणे मुलांमध्ये दिसून येतात.
स्थूलपणा का वाढतो आहे -
मुलांमध्ये वाढत चाललेले जंकफूड तसेच बंद पाकिटातील ‘रेडी टू इट’ पदार्थांचे सेवन, कमीत कमी शारीरिक हालचाल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा अतिवापर वाढत आहे. लॉकडाउन काळात घरी असल्याने तसेच शाळा, मैदाने बंद असल्याने परिणामी मुलांना धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आदी लक्षणे दिसताच पालक डॉक्टरांकडे धाव घेत आहेत. मुलाचे वय आणि उंचीच्या गुणोत्तरानुसार आवश्यक वजनापेक्षा साधारण १० ते १२ किलो वजन अधिक दिसून येत असल्याने ते मूल स्थूलतेकडे झुकत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
योग्य निदान व काळजी आवश्यक -
पौगंडावस्थेपर्यंत मुलांमध्ये शरीराचा विकास होत असतो. हार्मोन्सचे बदल घडत असतात. यामुळे लहान मुलांमध्ये शक्यतो अनुवंशिकरीत्या लठ्ठपणा आलेला असतो, तर काही मुलांमध्ये मुख्यत्वे खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैली यामुळे लठ्ठपणा येतो. मुलांच्या आहारावरील नियंत्रण आणि व्यायाम या मार्गानेच वजन कमी करता येते. लठ्ठपणावर औषध उपचार करण्यापूर्वी योग्य निदान व काळजी आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात.
काय खावं, का करावे?
शाकाहारी, वेगन डाएट चांगलं आणि मांसाहार खराब हा मोठा भ्रम आहे. उलट आपले मानवी शरीर हे विशेषत: अॅनिमल बॉडी आहे. अॅनिमल बॉडीमध्ये अॅनिमल प्रोटीन सहजरित्या पचतात. तर प्लान्ट प्रोटीन पचायला जड असतात. मात्र, सप्लिमेंट प्रोटीन अतिशय खराब असतात. ते न खाण्याचा सल्ला आम्ही रुग्णांना देतो. लठ्ठपणा होऊ नये, यासाठी माझा सल्ला असा आहे की, सोमवार ते शनिवार तोंडाला कुलूप लावा. या दिवसात तुम्ही पोळी, भाजी, भात, वरण असा चौरस आहार घ्यावा आणि रविवारचा एक दिवस चीट डे ठेवा. त्या दिवशी आवडेल ते खा. यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. पण चीट डेच्या एक दिवस आधी आणि नंतर दुप्पट व्यायाम करा. भरपूर कॅलरी बर्न करा, असे डॉक्टर सांगतात.
जनजागृती मोहीम -
लहान मुलांवरील स्थूलतेवर वेळीच लक्ष केंद्रीत केले, तर या भावी पिढीला भविष्यात विविध आजारांनी ग्रस्त होण्यापासून वाचवू शकू, या उद्देशातून डॉ. बोरुडे यांच्या पुढाकाराने चाईल्ट ओबेसिटी सपोर्ट टीम निर्मिती केली आहे. वैद्यकीय मदत, मार्गदर्शन आणि यासोबतच लठ्ठपणा, मुलांच्या लठ्ठपणाचे निदान करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्यांची माहिती, कमीत कमी खर्चात उपलब्ध करून देणे, विमा कंपनीच्या मदतीने खर्च कसा उभारता येईल यावर मार्गदर्शन संकेतस्थळाच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे. लहान मुलांमधील वाढत्या लठ्ठपणाबाबत घर, शाळा आणि बाहेरील वातावरणामध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याचा आपोआपच परिणाम मुलांच्या वागण्यावर होतो.
हेही वाचा -चर्चा न करता सरकार विधेयक मंजूर करतंय - संजय राऊत