मुंबई OBC leaders on Maratha quota :कुणबी मराठा आरक्षणाचा वाद असताना आधी आरक्षण वाढवा मग याबाबत विचार करा, अशी भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे. आंदोलन सुरू असलेल्या मंचावरूनही मी हीच भूमिका मांडली होती. असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय. ओबीसी समाजाची जी भूमिका घेतली असेल तीच भूमिका माझी राहणार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही :या संदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू देणार नाही. ओबीसीचा नेता म्हणून मीही स्पष्ट भूमिका मांडत आहे. ओबीसीच्या मूळ आरक्षणाला धक्का न लागता, वाढी आरक्षण देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ओबीसीच्या मूळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, सरकारनं त्यासाठी वेगळी सोय करावी. मराठा, ओबीसी समाजामध्ये सरकारनं भांडण लावू नयेत, असा इशाराही यावेळी वडेट्टीवार यांनी दिला. एकीकडे सरकार वेगळी भूमिका मांडतं तर दुसरीकडं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वेगळी भूमिका मांडतात. नेमकं भाजपाचं काय सुरू आहे? हे लोकांना कळायला मार्ग नाही. भाजपा लोकांना फसवण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील त्यानी केलाय. दोन्ही समाजाकडून मत मिळवण्यासाठी जर अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका आपण घेणार असाल तर, मराठा समाजाला काय समजायचं ते समजेल असंही ते म्हणाले.
ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही :52 टक्के ओबीसी समाजाला 27% आरक्षण आहे. जर तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर, ओबीसीचं आरक्षण वाढवून द्या. या भूमिकेला मंत्री छगन भुजबळ यांचा सुद्धा पाठिंबा आहे. माझे त्यांच्याशी दूरध्वनी वरून बोलणं झालं असून त्यांनी या भूमिकेला समर्थन दिलंय. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीचं नुकसान होऊ नये ही आमची भूमिका आहे. सरकार कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देत असेल तर त्यांना ओबीसीमधून आरक्षण देणार का? ओबीसीमधून आरक्षण देणार असाल तर आरक्षण वाढवून द्या, अन्यथा आम्ही ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही, असा इशाराच वडेट्टीवार यांनी दिला आहे.