मुंबई- ओबीसी आणि भटक्या विमुक्तांकडून आपल्या हक्काच्या मागण्यासाठी आज आझाद मैदानावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजातील बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते. यावेळी आरक्षणास पात्र नसतानाही सर्वेक्षणाचा फार्स करून मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा दिला गेला, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा विविध मागण्यांसाठी एल्गार मोर्चा - azad maidan
ओबीसी आणि भटक्या विमुक्तांकडून आपल्या हक्काच्या मागण्यासाठी आज आझाद मैदानावर एल्गार मोर्चा काढण्यात आला.
एकूण ३४० ओबीसी जातींना फक्त १९ टक्के आरक्षण आणि ज्यांना पूर्वीच्या ३ मागासवर्ग आयोगांनी आणि उच्च न्यायालय यांनी आरक्षण नाकारले होते. त्यांना खोटी लोकसंख्या दाखवून तब्बल १६ टक्के आरक्षण दिले गेले. आरक्षणास पात्र नसतानाही सर्वेक्षणाचा फार्स करून मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा दिला गेला. शिवाय उच्चवर्गीयांना आर्थिक मागासलेपणाचा निकष लावून १० टक्के आरक्षण बहाल केले. ही राज्यघटनेची पायमल्ली आहे. हा ओबीसी भटक्या-विमुक्तांच्या आरक्षणावरील हल्ला आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईचे रस्त्यावर चक्का जाम करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
या आहेत मागण्या -
- गायकवाड राज्य मागासवर्ग आयोग व त्यांनी शासनाला दिलेल्या अहवाल रद्द करावा.
- ओबीसी आरक्षणाला धक्का देत मराठा समाजाला १६ आणि सवर्ण जातींना १० टक्के हे आरक्षण घटनाबाह्य व बेकायदेशीर असल्याने हे रद्द करण्यात यावे.
- ओबीसी आरक्षणाविषयी राज्य सरकारने अनुभवी वकिलांची नेमणूक करून त्याला न्याय द्यावा.
- ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे.
- ओबीसींच्या नोकऱ्यांमधील अनुशेष भरल्याशिवाय मेगा भरती करू नये.
- सन २०११-१२ ची सामाजिक व आर्थिक जनगणना जाहीर करावी. तर २०२१ सार्वत्रिक जनगणना जातीनिहाय व्हावी.
- जातीचे बोगस दाखले घेऊन आरक्षणाचा गैरफायदा घेणाऱ्या व देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
- शामरावजी पेजे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी त्वरित करावी. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.