मुंबईNylon Manja Accident :मकर संक्रांत आणि पतंग, मांजा हे एक समीकरणच बनलंय. परंतु, पतंगबाजीचा उत्सव निष्पाप जीवांवर बेतत आहे. शासनानं चायनीज मांजावर बंदी घातलेली असताना बाजारात सर्रास चायनीज मांजाची विक्री होत आहे. या चायना मांजामुळं दुखापत होऊन मृत्यू होण्याच्या अनेक घटना संक्रांतीच्या दरम्यान घडतात. पतंग उडवताना मांजा तुटल्यानंतर तो रस्त्यावर, झाडांवर गुंडाळला जातो. त्यामुळं तो अतिशय घातक ठरतो. रस्त्यावरून जाणारा वाहन चालक त्या मांजात अडकल्यास मोठी इजा होते. काहीजण त्यात जीवदेखील गमावतात.
चायनीज नायलॉन मांजामुळं दुचाकीस्वार गंभीर :रविवारी (14 जानेवारी) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विलेपार्ले पश्चिम महामार्गावर दुचाकीवरून जात असताना नायलॉन मांजा गळ्याभोवती अडकल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. जालिंदर भगवान नेमाने ( वय 41) असं या जखमी दुचाकीस्वाराचं नाव असून तो सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतो. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
महिला झाली रक्तबंबाळ : सोमवारी (15 जानेवारी) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शिल्पा महाडिक (वय 39) या स्कूटीवरुन सहारा स्टार ब्रिजवरून वेस्टर्न हायवे दक्षिण वाहिनीनं जात असताना मांजामुळं त्या जखमी झाल्या आहेत. त्यांची हनुवटी रक्तबंबाळ झाली. त्यानंतर तत्काळ त्यांना वाकोला पोलीस स्टाफच्या साहाय्यानं व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. महिलेचे कुटुंबीय आल्यानंतर महिलेला 'सरला हॉस्पिटल'मध्ये उपचारासाठी दाखल केलं. दरम्यान, हेल्मेट घातलेलं असतानादेखील महिलेला गंभीर दुखापत झाल्याची माहिती वाकोला वाहतूक पोलिसांनी दिली.
पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू :काही दिवसांपूर्वीचायनीज मांजामुळे मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पतंगाच्या मांजाने गळा चिरल्यानं मुंबईतील समीर जाधव या 37 वर्षीय पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. घरी परतत असताना वाटेतच चायनीज मांजामुळं पोलीस हवालदाराचा गळा चिरला गेला. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही.
हेही वाचा -
- पतंग व्यवसायावर 'संक्रांत'! मांजाच्या भीतीनं मुले आणि युवकांमध्ये पतंग उडविण्याबाबत निरुत्साह, व्यावसायिक चिंतेत
- नागपूर महापालिकेची चायनीज मांजा विकणाऱ्यांविरुद्ध मोहीम
- संक्रांत! नायलॉन मांजाचे आत्तापर्यंत दोन बळी; अनेक ठिकाणी कारवाई