महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील परिचारिकांची 21 जूनपासून आंदोलनाची हाक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र - परिचारिका संघटनेचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील सरकारी रुग्णालयात परिचारिकांनी 21 जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे. दोन दिवस 2 तास काम बंद, दोन दिवस पूर्ण दिवस काम बंद, तर या आंदोलनानंतर मागण्या मान्य झाल्या नाही, तर 25 जूनपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.

राज्यातील परिचरिकांची 21 जूनपासून आंदोलनाची हाक
राज्यातील परिचरिकांची 21 जूनपासून आंदोलनाची हाक

By

Published : Jun 14, 2021, 6:01 PM IST

मुंबई - राज्यातील सरकारी रुग्णालयात परिचारिकांनी 21 जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे. पदभरती, पदोन्नती, कोविड भत्ता, रजा आणि इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. त्यानुसार दोन दिवस 2 तास काम बंद, दोन दिवस पूर्ण दिवस काम बंद, तर या आंदोलनानंतर मागण्या मान्य झाल्या नाही, तर 25 जूनपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.तसेच, या मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देखील पाठवले आहे.

काय आहेत मागण्या -

राज्यात सरकारी रुग्णालयात परिचारिकांची संख्या कमी आहे. अनेक वर्षे रिक्त पदे भरली न गेल्याने ही संख्या कमी असून, सद्या सेवेत असलेल्या परिचरिकांवर कामाचा ताण आहे. तर कोरोना काळात हा ताण प्रचंड वाढला आहे. त्यामुळे रिक्त पदे भरावी आणि पदोन्नती द्यावी अशी मुख्य मागणी परिचरिकांची आहे. कोविड काळात सरकारी परिचारिका जिवाची बाजी लावत रुग्णसेवा देत आहेत. पण त्यांना योग्य तो मोबदला मिळताना दिसत नाही. त्यामुळे कोविड भत्ता वाढवावा, केंद्र सरकारप्रमाणे कोविड भत्ता द्यावा अशी दुसरी मागणी आहे. त्याचबरोबर कोरोना काळात 7 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी द्यावी, शिल्लक रजेचा प्रश्न आणि अन्य मागण्या या संघटनेच्या आहेत. या मागण्यांसाठी संघटना कित्येक महिने विविध माध्यमातून आंदोलन करत आहेत. परंतु कायम त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.

...तर बेमुदत संप

प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिका आंदोलन करत आहेत. दरम्यान, सर्व स्तरावर पाठपुरावाही सुरु आहे. मात्र, या मागण्या काही मान्य होताना दिसत नाहीत. त्यामुळे परिचरिकांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी परिचारिकांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार (21-22 जून)ला दोन तास, (23 -24 जून)ला पूर्ण दिवस. आणि (25 जून)पासून बेमुदत संप त्यांनी पुकारला आहे. कोरोना काळात राज्यभरातील परिचारिका संपावर गेल्या, तर त्याचा मोठा फटका आरोग्य यंत्रणेला बसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details