मुंबई- आज संपूर्ण जगासमोर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. देशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही परिचारिका (नर्स) जीवाची बाजी लावत कोरोनाशी लढत आहोत. या कोरोनाला आम्ही हरवणार, पण त्यासाठी आम्हाला तुमची भक्कम साथ हवी. तेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये लढतो, तुम्ही घरात राहून कोरोनाशी लढा, असे कळकळीचे आवाहन मुंबईतील परिचारिकांनी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने केले आहे.
आज जागतिक आरोग्य दिन आहे. पहिल्यांदाच आरोग्य दिन अशाप्रकारे आरोग्य क्षेत्रातील मोठ्या संकटात साजरा होत आहे. तेव्हा कोरोनाचे संकट टळो, अशीच अपेक्षा यानिमित्ताने आरोग्य क्षेत्राने व्यक्त केली आहे. नर्सेस रुग्णांसाठी, आपल्यासाठी काय आहेत, ते मुंबईला नव्हे तर सगळया जगला आज समजले आहे. कस्तुरबा, सेंट जॉर्ज, जीटी रुग्णालयापासून राज्यातील सर्व रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये नर्स कोरोनाशी दोन हात करत आहेत. पीपीई किट, सॅनिटायझर्स, मास्कचा तुडवडा असतानाही त्या काम करत आहेत. आम्ही हजारो नर्स जीवघेण्या परिस्थितीत काम करत असताना आम्हाला सुरक्षित ठेवायचे असेल तर तुम्ही घरात राहाणे गरजेचे आहे. जेणेकरून रुग्णांची संख्या कमी होईल आणि आमचा ताण कमी होऊन हे संकट पळून जाईल. तेव्हा आम्ही सैनिक बनून मैदानात उतरलो आहोत, कोरोनाशी लढत आहोत. तुम्ही घरात बसून कॊरोनाशी लढा, इतकेच आमचे आजच्या दिवशी नागरिकांना कळकळीचे आवाहन, अशा शब्दात परिचारिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.