मुंबई : सध्याचे धावपळीचे जीवन, वेळेवर झोप नसणे, काम आणि इतर तणाव यामुळे मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे. मानसिक आजार झालेल्या रुग्णांसाठी सरकारने टेली मानस ही हेल्पलाईन सुविधा सुरु केली आहे. या हेल्पलाइनवर करण्यात येणाऱ्या कॉलपैकी सर्वाधिक कॉल हे २० ते ४० वयोगटातील आहेत. यामुळे मानसिक रुग्णांमध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती ठाणे मानसिक रुग्ण उपचार हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळूक यांनी दिली.
हेल्पलाईन नंबर : सध्याच्या काळात यश, अपयश, नैराश्य, कुटुंब कलह, कौटुंबिक वाद, प्रमाणापेक्षा अधिक दारू पिणे यामुळे मानसिक आजार होतात. यात नैराश्य, स्क्रिझोफेनिया, एन्झायटी आदी प्रकार आहेत. अशा रुग्णांना समुपदेशनाची गरज असते. त्यासाठी १४४१६ हा हेल्पलाईन नंबर म्हणून देण्यात आला आहे. या नंबरवर कॉल केल्यावर आपल्याला हव्या असलेल्या भाषेत संभाषण करता येते. समुपदेशन करणारे रुग्णाच्या समस्या २० मिनिटे ऐकून घेतात. त्यानंतर ते समुपदेशन करतात. गरज पडल्यास डॉक्टरांना कॉल फॉरवर्ड केला जातो. डॉक्टरांनी निर्णय घेतल्यास संबंधित रुग्णांला जवळच्या रुग्णालयात पाठवले जाते. त्यानंतर गरज पडल्यास मानसिक उपचार रुग्णालयात पाठवले जाते, अशी माहिती डॉ. मुळूक यांनी दिली.
या वयोगटातील रुग्णांचे सर्वाधिक कॉल : १४४१६ हा हेल्पलाईन नंबर २४ तास कधीही कॉल करता येतो. त्यासाठी ३ शिफ्टमध्ये समुपदेशन करणारे आणि डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर दिवसाला १०० ते १५० कॉल यायचे. त्यात काही प्रमाणात घट होऊन सध्या ठाणे मनोरुग्णालयाच्या हेल्पलाइनवर ७५ कॉल येतात. १५ ते ५० वयातील रुग्णांचे कॉल येतात. त्यामध्ये २० ते ४० वयोगटातील रुग्णांचे सर्वाधिक कॉल असतात. झोप न येणे, एन्झायटी, कामाचे टेंशन तसेच ड्रग्स यामुळे रुग्ण मानसिक रुग्ण झाल्याचे समोर येत आहे, असे डॉ. मुळूक यांनी सांगितले.
औषधांपेक्षा हे उपाय करा : मानसिक रुग्णांना झोप लागत नाही, भविष्यात काय होईल याची भीती असते अशा रुग्णांना आम्ही औषधे घेऊन बरे करण्यापेक्षा त्यांनी आपल्या जीवनात आणि विचार करण्यात बदल करावा. भविष्याचा विचार करण्यापेक्षा आताचा क्षण जीवनात पुन्हा येणार नाही. वर्तमानात चाला, काल्पनिक भीती बाळगू नका. रोज मित्र परिवारासोबत गप्पा मारणे, बाहेर फिरणे, व्यायाम करणे, काम करणे, योग्य, व्यायाम, पोहणे, मैदानी खेळे या सारख्या उपाययोजना केल्यास औषधे न घेता यामधून बाहेर पडता येते. आमच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोफत औषधे दिली जातात, अशी माहिती ठाणे मानसिक रुग्ण उपचार रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी दिली.