मुंबई - आज कुर्ला येथील ४ वर्षाच्या एका मुलीचा गोवरमुळे ( Measles ) मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १५ झाला आहे. त्यापैकी १२ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहे. सध्या १७ रुग्ण ऑक्सीजनवर, ४ रुग्ण आयसीयुमध्ये तर १ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या ( Number of measles cases ) आरोग्य विभागाने दिली.
रुग्ण ऑक्सीजनवर, १ व्हेंटिलेटरवर -मुंबईत ७६ लाख ४४ हजार ३८ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ४८३९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले ४४७ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३३९ बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी १२७ बेडवर रुग्ण असून इतर बेड रिक्त आहेत. १५८ जनरल बेडपैकी १०६, १४६ ऑक्सीजन बेड पैकी १७, ३५ आयसीयु बेडपैकी ४ बेडवर रुग्ण आहेत. १९ व्हेंटिलेटर असून त्यापैकी १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
मुलांचे लसीकरण -आतापर्यंत अतिरिक्त सत्रात २२ हजार ६०० मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या २ लाख २४ हजार १३० मुलांपैकी २६,७२१ बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे. मुंबईत ९ महिने पेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे प्रमाण १० टक्के पेक्षा अधिक आहे अशा विभागातील ६ ते ९ महिन्यातील ४७४५ बालकांपैकी ९५३ बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे.
मुंबईत १२ तर बाहेरील ३ मृत्यू - मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १५ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १२ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण १२ मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. ४ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
या उपाययोजना -गोवर रुग्ण शोधण्यासाठी घराघरात जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण करून ॲटिव्ह रुग्ण शोधून काढत आहोत. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन "अ" दिले जात आहे. यामुळे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य होते. लसीकरण झाले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुलं असणे, रक्तक्षय, अँनिमिया यामुळे मृत्यू वाढू शकतात. यासाठी व्हिटॅमिन "अ" देणे, लक्षणे दिसल्यास रुग्णालय भरती करणे, त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणे या उपाययोजना केल्या तर मृत्यूचे प्रमाण रोखता येवू शकते. मुलांना वेळेवर लसीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. विविध रुग्णालयात ३०० हून अधिक बेडस तयार आहेत. त्यापैकी बहुतेक बेड रिक्त आहेत. आयसीयु आणि व्हेंटिलेटर तयार आहेत अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.