मुंबई - येथे आणि पुण्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याची बाब वारंवार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) केंद्राचे विशेष पथक मुंबईत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते. या पाहणीनंतर पथकाने व्यक्त केलेला अंदाज मुंबईकरांसाठी धक्कादायक असा आहे. येत्या ८ दिवसांत म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत मुंबईत तब्बल ४२ हजार ६०४ रुग्ण असतील आणि १५ मेपर्यंत हाच आकडा ६ लाख ५६ हजारांपर्यंत असू शकेल, असा अंदाज या पथकाने व्यक्त केला आहे.
आत्तापर्यंत मुंबईत ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे, त्या गणिताच्या आधारे हा अंदाज केंद्रीय आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने वर्तवला आहे. याच पद्धतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी १ ते १५ मे या दरम्यान महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत कोरोनाच्या परिस्थितीत स्पाईक अर्थात रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढू शकते असा अंदाज वर्तवला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने व्यक्त केलेले अंदाज मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहेत. मुंबई शहरातल्या धारावी, माहीम, वरळी, महालक्ष्मी, गोवंडी, नागपाडा, मानखुर्द आणि अंधेरी पश्चिम येथील दाटीवाटीच्या परिसरात पसरलेल्या कोरोना रुग्णांचा आढावा घेता, 15 एप्रिल पर्यंत अश्या भागात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात समोर येईल अशी भीती केंद्राने व्यक्त केली असल्याचे बोलले जात आहे.
हा अंदाज व्यक्त करताना केंद्रीय पथकाने आत्तापर्यंत मुंबईत दिसणाऱ्या ट्रेंडचा आधार घेतला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या इतक्या संख्येने वाढेलच, असे जरी ठामपणे म्हणता येणार नसले, तरी ती तेवढी वाढण्याची शक्यता नक्कीच आहे. त्यामुळे ही संख्या वाढली, तर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेवर त्याचा प्रचंड ताण पडणार आहे.
हेही वाचा -'पालघर प्रकरणात एकही 'मुस्लीम' व्यक्ती नाही; जातीचा रंग देणे दुर्दैवी'
यात ३० एप्रिलपर्यंत वाढू शकणारी रुग्णसंख्या पाहिली, तर ऑक्सिजनची सुविधा नसलेल्या आयसोलेशन बेडची संख्या ३० हजार ४८१ ने कमी असणार आहे. तर १५ मेपर्यंत जी रुग्णसंख्या वाढेल, त्यानुसार अशा आयसोलेशन बेडची संख्या तब्बल ४ लाख ८७ हजार ३३० ने कमी असणार आहे. मुंबईमध्ये सध्या ५ हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. त्यात साधारण २०० जणांचा बळी गेला आहे. मुंबईतील महापालिकेचे हॉस्पिटल, खासगी हॉस्पिटल, हॉटेल, खेळाची मोकळी मैदाने अशा ठिकाणी देखील कोरोना रुग्णांच्या क्वॉरंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, ती देखील आता अपुरी पडू लागली आहे. सर्वात धोकादायक बाब म्हणजे ज्या कोरोनाग्रस्तांच्या देखभालीसाठी ज्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांना मात्र, दूरवरच्या ठिकाणाहून प्रवास करून रुग्णालयात यावे लागते. या प्रवासात त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असू शकते.
बातम्यांसाठी फिरणाऱ्या पत्रकारांना देखील अशाच प्रकारे कोरोनाची लागण झाल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था रुग्णालयाजवळच केली, तर त्याचा प्रसार आटोक्यात आणणे शक्य होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
केंद्राने केलेल्या अनुमानातील हे संभाव्य आकडे असल्याची चर्चा आहे . मात्र, केंद्राचा इशारा अस्तित्वात आल्यास आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडणार आहे. केंद्रीय पथकाने आज (बुधवारी) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत धारावी परिसराला भेट देऊन तेथील परिस्तिथीचा आढावा घेतला. राज्य सरकारला दिलेल्या इशाऱ्याचा त्यांनी उल्लेख केला नाही. याबाबत आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, हा विषय अतिशय गंभीर आहे, वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्या नंतरच या संबंधी भूमिका मांडली जाईल. आरोग्य सेवा आयुक्त डॉ. अनुपकुमार यांनी सांगितले, वेगवेगळ्या स्तरावर अशा संभावना व्यक्त केल्या जातात. मात्र, केंद्राने अद्याप यासंदर्भात केलेले कोणतेही अनुमान आमच्या पर्यंत पोहोचले नाही.