मुंबई- देशभरात एनआरसी आणि सीएएवरून वाद सुरू झाला आहे. हा वाद आता मुंबई महापालिकेपर्यंत पोहचला आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजप आणि महाविकास आघाडीमधील नगरसेवक आमनेसामने आल्याने शाब्दिक खडाजंगी झाली. या खडाजंगी दरम्यान शिवसेनेने मात्र कोणतीही भूमिका न घेता तटस्थ भूमिका घेतली.
एनआरसी, सीएएचा वाद पालिकेत; भाजप - महाविकास आघाडी आमने सामने - सीएए
देशभरात एनआरसी आणि सीएएवरून वाद सुरू झाला आहे. हा वाद आता मुंबई महापालिकेपर्यंत पोहचला आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजप आणि महाविकास आघाडीमधील नगरसेवक आमनेसामने आल्याने शाब्दिक खडाजंगी झाली.
एनआरसी आणि सीएए कायद्यावरून लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यामुळे जन्म दाखले बनवण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयात जन्म नोंदणी दाखले बनवण्यासाठी गर्दी झाली आहे. पालिकेकडे रेकॉर्ड नसल्याने नागरिकांना जन्म दाखले बनवण्यासाठी अडचणी येत आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने पालिकेने दाखले बनवण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार व गटनेते रईस शेख यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. पालिकेच्या विभाग कार्यालयात जन्म नोंदणीचे रेकॉर्ड नसल्याने नागरिकांना सतत फेऱ्या माराव्या लागत आहेत. पालिकेकडे डिजिटल रेकॉर्ड नसल्याने अनेकांचे जन्म प्रमाणपत्र बनवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे पालिकेने जास्त कर्मचारी नियुक्त करून त्वरित जन्म प्रमाणपत्र बनवून द्यावीत तसेच इतर सर्व प्रमाणपत्र डिजिटल करावीत अशी मागणी त्यांनी केली.
रईस शेख यांच्या मागणीला काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, काँग्रेसचे आसिफ झकेरिया, जावेद जुनेजा यांनी पाठिंबा दिला. तर भाजपच्या नगरसेविका ज्योती आळवणी आणि राजश्री शिरवडकर यांनी जन्म व इतर दाखले मिळण्यासाठी अडचणी येत आहेत हे सत्य आहे. मात्र, त्याचा केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. या चर्चेदरम्यान भाजपविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाचे नगरसेवक यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. या खडाजंगी दरम्यान शिवसेनेने मात्र तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.