मुंबई- गणेशोत्सव दरम्यान भाविकांची संख्या पाहता मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ड्ट रुग्णालयाने पुढाकार घेत मुंबईतील ५० हून अधिक गणेश मंडळांतील २५० स्वयंसेवकांना कार्डिओ पल्मनरी रेसुसिटेशन (सीपीआर) आणि बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) यांचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे गणेशोत्सव दरम्यान वैद्यकीय आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यात मंडळांना मदत होणार आहे.
मुंबईत मोठ्या उत्सवात साजरा होणारा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी गणेशोत्सवाचे देखावे बघण्यासाठी अनेक ठिकाणी लोक फिरत असतात. अशा वेळेस वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या समस्यांचा सामना करण्यासाठी मुंबई सेंट्रलचे वोक्हार्ड्ट रुग्णालय गणेश मंडळांच्या मदतीला सरसावले आहे. रुग्णालयातर्फे स्वयंसेवकांना सीपीआर व बीएलएस तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीला कार्डिअॅक अरेस्ट (हृदयक्रिया बंद पडणे) झाल्यास ही तंत्रे उपयुक्त ठरतात. त्यामुळे धामधुमीच्या काळात कोणाला कार्डिअॅक अरेस्ट झाल्यास मंडळांना सदरील उपाय वापरुन त्या व्यक्तीचे प्राण वाचवता येणार आहे.