मुंबई :हिंदू जन आक्रोश मोर्चा या मुद्द्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी, हिंदू जन आक्रोश मोर्चावर उद्धव ठाकरे यांचा आक्षेप का आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या मोर्चावर एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने सुद्धा आक्षेप घेतलेला नसताना उद्धव ठाकरे या मोर्चावर आक्षेप का घेत आहेत असं सांगत लव जिहाद व लँड जिहादसाठी हा मोर्चा आहे. या मोर्चाने हिंदू जागृत झाला असून, तो एकत्र आला तर त्यावर आक्षेप घेण्यासारखे काय आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवार हिंदू रक्षणाची भूमिका घेत आलेला आहे व घेत राहील असेही त्यांनी सांगितले आहे.
मिरवणुकीत अडथळा का आणला?: पुढे आशिष शेलार म्हणाले की, गुढीपाडव्याच्या दिवशी गिरगाव येथील स्वामी विवेकानंद मित्र मंडळाने हिंदू नववर्षानिमित्त मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीला उद्धव ठाकरे गटाने अडवणूक केली. जातिभेद, जात-पात, भेदभाव सर्व विसरून ही मिरवणूक निघालेली असताना उद्धव ठाकरे गटाने मिरवणुकीत अडथळा का आणला? याचे उत्तर सुद्धा त्यांनी द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, मालवणीमध्ये राम भक्तांची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यादरम्यान एका विशिष्ट धर्माच्या बाजूने त्यावर हल्ला करण्यात आला. त्या धर्माच्या बाजूच्या लोकांसोबत कोण उभं होतं? तेव्हा तुमची भूमिका संशयास्पद होती, असं सांगत स्वतःच्या वडिलांनी मांडलेले विचार फक्त मतांसाठी सोडले असा आरोपही शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
सावरकरांबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा? : काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार सावरकरांची बदनामी करत आहेत. त्याचे तुम्हाला शल्य नाही, त्रागा नाही, तुमची प्रतिक्रिया केवळ लुटूपुटूच्या लढाई सारखी आहे. राहुल गांधींकडून माफी मांगा व त्यांच्यासोबत बसा अशी आम्ही तुम्हाला विनंती केली आहे. राहुल गांधी सातत्याने सावरकरांची बदनामी करत आहेत. त्यांनी माफी मागितली की नाही किंवा हा मुद्दा त्यांनी तात्पुरता बाजूला ठेवला आहे हेसुद्धा अजून समजलेले नाही. या विषयावर ते काहीच बोलत नाहीत असे म्हणत त्यांनी माफी मागितली असेल तर त्याचे ठोस पुरावे आम्हाला द्या असेही आशिष शेलार म्हणाले आहेत.