मुंबई - देशभर गाजत असलेले अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण आणि त्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध महाविकास आघाडीचा वाद काल राजभवनाच्या अंगणात पोहोचला. आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत मौन सोडले आहे. कंगना प्रकरणावर मी नाराज नसून त्याच्याशी माझे काही देणे-घेणे नाही, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.
कंगना प्रकरणावरून राज्यपाल कोश्यारी नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी या प्रकरणाचा अहवाल केंद्र सरकारला पाठवल्याचेही वृत्त येत होते. राज्यपालांच्या स्पष्टीकरणानंतर आता या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कॉफीटेबल बुकचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी त्यांनी मनमोकळी चर्चा करत राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केले.
महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपालांच्या वादाचे केंद्रबिंदू असलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांवर बोलताना कोशारी म्हणाले, ज्यांना नाव पाठवायचे आहे ते नाव पाठवत नाहीत आणि मग राज्यपालांनी आपल्या मनाने नियुक्त्या केल्या की, शिव्या देणार! हे बरोबर नाही.
मी महाराष्ट्रात आणखी एक वर्ष राहिलो तर उत्तम मराठी भाषण करू शकेल. जेव्हा माझ्यावर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी आली तेव्हा लवकर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर येथे आल्यानंतर राज्यात मुसळधार पाऊस होता, त्यानंतर अतिवृष्टी झाली, निवडणूक झाली, सरकार स्थापनेचे नाट्य झाले. मात्र, तरीही सर्वांचा स्नेह मिळाला असल्याचे कोश्यारी यांनी आवर्जून नमूद केले.
राज्यातील राष्ट्रपती राजवटीची घटना वेदनादायक होती. राज्यात राष्ट्रपती शासन लागायला नको होते. त्याकाळात शेतकरी अडचणीत होता. आंदोलने होत होती. त्यामुळे मला शेतकऱ्यांना मदत करायची होती. मी त्याबाबत ऑर्डर घेऊन यायला सांगितले. दुपारी बैठक झाली व प्रति हेक्टर आठ हजार रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर शेतकरी नाराजीबाबत सूर ऐकला नाही, असा दावा राज्यपालांनी केला.
मला भटकंती आवडते म्हणूनच महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये फिरलो आता मात्र, कोरोना आल्याने मर्यादा पडल्या. कोरोना नव्हता तोपर्यंत मी गडचिरोलीमध्ये जाऊन आलो. नंदुरबारलाही गेलो. कोल्हापूरला गेलो तिथे 16 वर्षानंतर पहिल्यांदा राज्यपाल गेले होते, असे कोश्यारी यांनी सांगितले. इतकी वर्षे सरकारने राजभवनाकडे लक्षचं दिले नाही. येथील कर्मचार्यांना वेतन आयोग दिला नाही. हे कर्मचारी महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी नाहीत का? विधिमंडळ, कोर्टात वेतन आयोगानुसार वेतन मिळते तर मग येथे का नाही? मी येथील कर्मचार्यांना वेतन आयोग लागू केला. 'धोती-कुर्तेवाला है, तो इसको अंग्रेजी नही आती होगी ऐसे समजते है', असे मिश्किल भाष्य कोश्यारी यांनी केले.
मी कुणाच्या कामात हस्तक्षेप करत नाही. माझा कोणाशी संघर्ष नाही, सर्व माझे मित्र आहेत. मी राज्यसेवक आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेवटी स्पष्ट केले.