मुंबई- इंग्रजी माध्यमाच्या नादात मराठी भाषिक पालकांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद पडणार असल्याची ओरड सुरू आहे. अनेक शाळा बंद देखील पडल्या आहेत, तर कित्येक शाळेमधील पटसंख्या खालावली आहे. हे होत असताना अमराठी परप्रांतीय पालकांनी मराठी शाळांना नवसंजीवनी दिली आहे. कांजूरमार्गमधील वैभव विद्यालय या मराठी शाळेत तब्बल 64 अमराठी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे परप्रांतीय म्हणून दुसर्यांना हिणवणार्या पालकांना चपराक बसली आहे.
कांजूरमार्ग आणि विक्रोळीमधील वैभव विद्यालय आणि विकास हायस्कूल या मराठी शाळेत इतर भाषिक मुलांनी प्रवेश घेऊन या शाळेमध्येही विकास होऊ शकते हे दाखवून दिले आहे. कर्वेनगर येथील वैभव विद्यालयात इतर भाषिक विद्यार्थ्यांची संख्या 2019-2020 च्या पटसंख्येनुसार 25 टक्के आहे. या विद्यालयातील एकूण विद्यार्थी संख्या 300 पेक्षा जास्त आहे. त्यामध्ये लहान मुलांपासून ते दहावीपर्यंत 64 अमराठी विद्यार्थी आहेत. यामध्ये हिंदी, तमिळ, गुजराती, तेलुगू, कन्नड, बंगाली मातृभाषा असणारे विद्यार्थी आहेत. शाळेत शिकणारे विद्यार्थी अत्यंत गरीब घरातील आहेत. दुसरीकडे विक्रोळीतील विकास हायस्कूलच्या प्राथमिक विभागामध्येही इतर भाषिक विद्यार्थी आहेत. यावर्षी या शाळेत 10 विद्यार्थी हिंदी भाषिक आहेत.