मुंबई- विविध मागण्यांना घेऊन शिवसेना भवनावर गेलेल्या शिक्षक महिलांना शिवसेना भवनातही घेतले नाही. तब्बल २ तास या महिला शिक्षक शिवसेना भवनासमोर उन्हात उभ्या होत्या. सेनेचे आमदार अनिल देसाई यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घालून देऊ, असे या शिक्षकांना सांगितले होते. मात्र, शिवसेनापक्षप्रमुख किंवा अनिल परब यापैकी कुणीही त्यांच्या भेटीसाठी आले नाही. अखेर सेनेचे कार्यालयीन पदाधीकारी पंडित यांनी महिला शिक्षकांची भेट घेतली.
गेले २५ दिवस मुंबईतील विनाअनुदानित शिक्षक महिला आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेकडे आपले गाऱ्हाणे मांडत आहे. किमान वेतन लागू करावे ही या महिला शिक्षकांची प्रमुख मागणी आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानीही महिलांनी आंदोलन केले. शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी या महिलांची समजूत घालून ४ दिवसात पक्षश्रेष्टींच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याचे आश्वासन या महिलांना दिले होते. मात्र, ४ दिवस उलटून गेल्याने महिला हवालदील झाल्या होत्या.