मुंबई - भारतीय नौदलात शौर्य दाखवणाऱ्या 22व्या 'किलर स्कॉडन'ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती नामांकन देण्यात आले आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे नौदलाच्या तुकडीला सर्वोच्च नामांकन देण्यात आले आहे. मुंबईच्या डॉकयार्ड येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नौदल प्रमुख एडमिरल आर हरिकुमार, पश्चिम नौदल प्रमुख अजेन्द्र बहादुर सिंह उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 'किलर स्कॉडन'ने 1971च्या युद्धामध्ये बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची प्रसंशा केली. नौदलाच्या ताकतीमुळेच त्या युद्धात पाकिस्तानच्या कराची बंदरापर्यंत युद्धाची झळ पाकिस्तानला बसली. तसेच, त्यानंतर भारतीय नौसेनेच्या ताकत सातत्याने वाढ झाली असून आत्मनिर्भर भारत अंतर्गत नौसेनेत अनेक महत्त्वाची कामे झाली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
युद्धात नौदलाच्या ताफ्याने पाकिस्तानच्या सागरी हद्दीमध्ये शिरून त्यांना धूळ चारली होती
1971 च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये देशाला विजय मिळाला होता. या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धात क्षेपणास्त्र वाहून नेणाऱ्या युद्धनौकांची महत्त्वाची कामगिरी होती. या युद्धात नौदलाच्या ताफ्याने पाकिस्तानच्या सागरी हद्दीमध्ये शिरून त्यांना धूळ चारली होती. या कार्याचा गौरव आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आला असून त्या ताफ्याला 'किलर स्कॉडन' असे नामांकन देऊन गौरव करण्यात आले आहे.