पंतप्रधानांचा 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम टीव्हीवर; यावर शिक्षक संघटनेने विचारला सरकारला जाब मुंबई : मागील वर्षी परीक्षांचा हंगाम बघून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा परीक्षा आल्याने २७ जानेवारीला सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी चर्चा करणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी तणावमुक्त कसे राहावे, याचा कानमंत्र देणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन केंद्र सरकारचा शिक्षण विभाग करणार :या कार्यक्रमाचे आयोजन केंद्र सरकारचा शिक्षण विभाग करणार आहे. या कार्यक्रमाचे शाळेत थेट प्रक्षेपण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याआधी आज परीक्षेमधून विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
थेट प्रसारण करण्याच्या सूचनेमुळे शिक्षकांची पळापळ :केंद्र सरकार शिक्षण विभागाने हा कार्यक्रम प्रत्येक शाळेत प्रसारित करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने नियोजन करण्यासंबंधित शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. मात्र, प्रत्येक शाळेत टीव्ही नसल्याने या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कसे करायचे, असा प्रश्न शिक्षकांना आणि शाळा संचालकांना पडला आहे.
प्रत्येक वर्गात तसेच शाळांमध्ये टीव्हीची असुविधा :मुंबई आणि इतर ठिकाणीही अनेक शाळांमध्ये प्रत्येक वर्गात तसेच शाळांमध्ये टीव्हीची सोय नाही. अशावेळी आता शिक्षकांना स्वतःच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमधून हे प्रसारण विद्यार्थ्यांना दाखवावे लागणार आहे. मात्र, त्यातही आवाजाची आणि व्हिडिओची स्पष्टता नसणार असल्याने विद्यार्थी त्याचा कसा लाभ घेणार, असाही प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
या आहेत अडचणी : याबाबत शिक्षक संघटनांशी संपर्क साधला असता, ग्रामपंचायत व महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेतील प्रत्येक वर्गात टीव्ही उपलब्ध नाही. चांगल्या आर्थिक स्थितीतील खासगी शाळा वगळता अनुदानित शाळेतही प्रत्येक वर्गात टीव्ही नसल्याने कार्यक्रमाचे प्रसारण कसे बघता येईल. काही शाळेत पर्यायी सभागृहाच्या सुविधा नाहीत. शाळेत संगणक लॅबमध्ये जागेच्या क्षमतेअभावी तासात एका संगणकासमोर शिकण्यासाठी एक बाकांवर दोन-तीन मुलांना सोबत बसावे लागते, अशी असुविधा व अडचणीत विद्यार्थ्यांना एकत्रित बसवून शांततेने थेट प्रसारण बघता येईल का, असा प्रश्न टीचर्स डेमॉक्रॅटिक फ्रंटच्या उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी उपस्थित केला आहे.
असा आहे शिक्षकांचा व्यस्त कार्यक्रम : नियोजनाचा सूचना देण्याआधी सर्व शाळांमध्ये टीव्ही किंवा कार्यक्रम लाईव्ह करण्याची सुविधा आहे का, या प्रश्नावर लक्ष देणे अपेक्षित होते. आज चित्रकला स्पर्धा आहे. २६ जानेवारीची तयारी करायची आहे. तसेच, अनेक माध्यमिक शाळांनी ठरवलेले वार्षिक नियोजनाच्या वेळापत्रकानुसार इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ३० जानेवारीपर्यंत चाचणी व प्रिलीम परीक्षाही सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे प्रसारण कसे करायचे, असाही प्रश्न राजेश पंड्या यांनी उपस्थित केला आहे.
अनुदान नाही टीव्ही कसा आणायचा : एका खासगी शाळेच्या शिक्षिकेशी संपर्क केला असता, आमच्या शाळेला आधी अनुदान मिळत होते. नंतर हे अनुदान मिळणे बंद झाले आहे. संस्थाचालक शिक्षकांचा पगार आणि लागणारे साहित्य पुरवत असतात. त्यामुळे शाळा सुरू आहे. शाळेला अनुदानाच मिळत नाही, तर मग शाळेत सोईसुविधा कशा निर्माण होतील. साधा खडू आणायचा झाला, तरी शिक्षकांना खिशातून पैसे खर्च करून आणावा लागत आहे. अशा परिस्थतीमुळे आम्हाला स्वतःच्या मोबाईलमधून किंवा कुठून तरी लॅपटॉपची सोय करून विद्यार्थ्यांना असे कार्यक्रम दाखवावे लागतात असे या शिक्षिकेने सांगितले.
हेही वाचा :Scan Boarding Pass : मुंबई विमानतळावर तिकीट बोर्डिंग पास स्कॅन होणार, प्रवाशांचा वेळ वाचणार