मुंबई - मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोनाचे २ हजारांहुन अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, हे रुग्ण चाचण्या वाढवल्याने समोर येत आहेत असे सांगत मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नसल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी म्हटले आहे. तसेच, जीम आणि रेस्टॉरंट मालकांशी चर्चा केली असून काही अटींसह त्यांना परवानगी देण्याचा विचार सुरू असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. सीआयआयकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
गुरुवारी मुंबईत २ हजार १६३ नव्या कोरोना रुग्णांची तर ५४ मृत्यूंची नोंद झाली आहे. याबाबत बोलताना चहल म्हणाले, शहरात कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. मुंबईत आधी ७ हजार चाचण्या केल्या जात होत्या. त्या तुलनेत सध्या दिवसाला १५ हजार चाचण्या केल्या जात असल्याचे चहल म्हणाले. महापालिकेने जाणीवपूर्वक चाचण्या दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आपली आरोग्य यंत्रणा नव्या रुग्णांची काळजी घेऊ शकते, याची खात्री होती. याआधी दिवसाला ७ हजार चाचण्यांमागे १ हजार १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. पण आता चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असल्याने ही संख्या २ हजार इतकी झाली आहे, असे चहल म्हणाले.