मुंबई :निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र पाठवले होते. त्यानुषंगाने आम्ही उत्तर दिले आहे. पक्षात अशी कोणतीच फूट पडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे. त्यामुळे त्यावर कोणीही दावा करू शकत नाही, अशा प्रकारचे उत्तर निवडणूक आयोगाला दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. अजित पवार यांच्याकडून दावा केला गेला की, राकॉं पक्ष आमचा आहे. 6 तारखेला पत्र पाठवून ३० तारखेला पक्षाच्या अध्यक्षाची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार हेच विठ्ठल असे भाष्य अजित पवारांनी केले आहे. मग, अध्यक्ष का बदलला? अशी विरोधाभासी भूमिका ते घेऊ शकत नाहीत. निवडणूक आयोगाला ही बाब लक्षात घ्यावी लागेल. सध्या संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू असून यात अजित पवार यशस्वी होतील, असे वाटत नाही. आम्ही यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र दिले असून स्मरणपत्र देखील पाठवले आहे. त्यामुळे हा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
निवडणूक आयोगाकडे राकॉं रजिस्टर पक्ष :आमदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला दिले होते. मग अजित पवार यांनी कधी बैठक घेतली, त्यांच्याकडे काय पुरावे आहेत. निवडणूक आयोगाकडे रजिस्टर पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उल्लेख आहे. त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत. हे सगळे विचारात घेतले तर विरोधाभास आहे. म्हणून आम्ही काही पेपर मागितले आहेत. अजित पवार गटाने काही पेपर दिले आहेत. निवडणूक आयोगाकडे आम्ही ते कागद मागितले आहेत. तसेच आमदारांचे निलंबन हे लगेच होत नसते. औरंगाबादच्या मुद्द्यावरून मला लांबच ठेवा, असेदेखील आव्हाड म्हणाले. राहुल गांधी यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने मला आनंद झाला आहे. 'हिस्टरी रिपीट इट् सेल्फ' असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधींच्या लढवय्यापणाची आठवण करून दिली.