मुंबई - राज्यातील शाळा आणि शिक्षण हे येत्या १५ जूनपासून सुरू करण्याचा अट्टाहास राज्य सरकारने सुरू केला आहे. बहुतांश ठिकाणी या शाळा प्रत्यक्षात भरणार नसल्या तरी त्या ऑनलाईन आणि डिजीटलच्या माध्यमातून सुरू केल्या जाणार आहेत. मात्र, सरकारच्या या भूमिकेविरोधात पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आमच्या मुलांचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट टळले नसताना शाळा आणि त्यातील शिक्षण सुरू करण्याची घाई हवीच कशाला? असा सवाल पालकांकडून करण्यात आला आहे.
शाळा लवकर सुरू करायची घाई हवीच कशाला? पालकांचा सवाल देशात सर्वाधिक कोरोनाचा कहर मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये माजला आहे. रोज शेकडो नवे कोरोनाची लागण झालेले रुग्ण समोर येत आहेत, अशा स्थितीत शाळा उशिरा सुरू झाल्या तरी त्यात काही नुकसान होणार नसल्याचे मत मागासवर्गीय विद्यार्थी-पालक अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण यादव यांनी व्यक्त केले. आपल्या राज्यात संस्थाचालकांनी शिक्षण हा एक धंदा केला असल्याने वर्गात सोशल डिस्टन्सचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर कोरोनाचे संकट शाळांमध्येही उद्भवू शकतील अशी भीती यादव यांनी व्यक्त केली आहे. म्हणून शाळा लवकर सुरू करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. विक्रोळी येथील पालक रमेश परमार यांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने शाळा सुरूच करू नये, अशी मागणी केली. शाळांपेक्षा आमच्या मुलांचा जीव महत्वाचा आहे. आज मुंबईसारख्या ठिकाणी जिथे डॉक्टरही सुरक्षित राहिलले नाहीत, त्या ठिकाणी आमच्या मुलांचे काही बरेवाईट झाले तर काय करायचे?,असा सवाल परमार यांनी केला आहे. पालक विद्या वाघमारे म्हणतात की, शाळा लवकर सुरू करण्याची घाई हवीच कशाला? सरकारने यासाठी अट्टहास करू नये. आमच्या मुलांचे जीव आणि त्यांचे आरोग्य महत्वाचे आहेत. त्यामुळे शाळा अजिबात लवकर सुरू करू नये, अशी त्यांनी मागणी केली. तर कायम विनाअनुदानित मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनीही शाळा आणि शिक्षण लवकर सुरू करण्याच्या सरकारच्या भूमिकेला कडाडून विरोध केला आहे. मुंबईसारख्या ठिकाणी शाळा सुरू केल्या तर यातून महाभयंकर परिस्थिती निर्माण होईल. यासाठी कोरोनोचे संकट पूर्णपणे टळत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करण्याचा अट्टहास सरकारने करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आमच्याकडे असंख्य पालक येऊन शाळा सुरू करू नका अशी मागणी करत असल्याचेही रेडीज म्हणाले.