मुंबई No Mobile For ST Bus Driver:महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या हजारो गाड्या आहेत. कोट्यवधी प्रवासी बसने प्रवास करतात; परंतु बस चालवताना काही बस चालक मोबाईलवर संभाषण करत असतानाची बाब काही लोकप्रतिनिधींना आढळली. त्यांनी महामंडळाच्या प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत महामंडळाने याबाबत आता महाराष्ट्र राज्य परिवहन बस चालक वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर करणार नाही, अशी बंदी त्यावर आणली गेलेली आहे.
बस चालकांवरील नवीन नियम:प्रवाशांची सुरक्षितता, त्यांच्या जीवाची हमी याबाबतच हा निर्णय घेतला असल्याचं महामंडळाचं म्हणणं आहे. प्रवाश्यांकडून अनेकदा तक्रारी प्राप्त होतात. प्रसारमाध्यमांवर देखील याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. त्यामुळे बस चालवताना मोबाईल हा कंडक्टरकडे देण्यात यावा. विना वाहक फेरीवरील चालकानं वाहन चालविताना आपला मोबाईल बॅगमध्ये ठेवावा. वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हरनं ब्लूटूथ, हेडफोन इत्यादी उपकरणाचा वापर करू नये. तसेच ही सूचना भाडेतत्त्वावरील बस चालकांना आणि शासकीय एसटी महामंडळ बस चालकांना देखील लागू असणार आहे.
तर होणार नियमभंग केल्याची कारवाई:महामंडळाच्या सूचना आदेशानुसार एसटी महामंडळाच्या बस ज्या मार्गाने जातात त्या मार्ग तपासणी पथकांनी सुरक्षा व दक्षता खाते यांनी दैनंदिन याबाबत निरीक्षण करावे. तसा अहवाल देखील सादर करण्याचे आदेश यामध्ये नमूद केलेले आहे. आदेशानुसार दोषी आढळल्यास त्याच्यावर खातेनिहाय नियमभंग केल्याची कारवाई देखील करण्यात येईल.