मुंबई -कुणीही घर खरेदी करायची असेल तर त्याला बाजारभावाप्रमाणे कर भरावा लागतोच.मात्र यामध्ये नियमितपणे रेडी रेकनर प्रमाणे वाढ होतच असते. तसेचघर खरेदी करताना तत्कालीन रेडी रेकनरच्या नुसार व्यवहार करावा लागतो. यामुळे घर खरेदी आणि घर विक्री करणाऱ्या नागरिक आणि विकासक या दोघांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळेल असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.
दर न वाढवण्याची मागणी -आज दिनांक १ एप्रिल पासून आर्थिक वर्ष सुरू होते. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरू केली जाते. बाजार मूल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येकवर्षी १ एप्रिलपासून लागू केले जातात. त्यावर जमीन आणि घरांचे दर निश्चित होतात. विकासकांची संस्था असलेल्या क्रेडाई व सामान्य नागरिकांकडून जमीन तसेच इमारत या मिळकतींच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात येऊ नये अशी विनंती राज्य शासनाकडे केली होती. याचा सकारात्मक विचार करुन रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.
नागरिक विकासक दोघांना फायदा - सर्वच व्यावसायिक आणि नागरिकांची कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने आर्थिक स्थिती खराब झाली होती. यामुळे राज्य सरकारने विकासक आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेडी रेकनरच्या दरात वाढ केली नव्हती. यामुळे घर खरेदीचे प्रमाण वाढल्याने विकासक आणि नागरिक दोघांचा फायदा झाला होता. याच अनुषंगाने येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच सन २०२३-२४ मध्ये रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे सामान्य नागरीकांना घर खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळेल तसेच व्यवसायात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन खरेदी विक्रीस चालना मिळेल असे विखे पाटील यांनी सांगितले.
यांना होणार फायदा - मालमत्ता खरेदी व विक्री करणाऱ्या दोघांनाही रेडी रेकनरचे दर वाढवले नसल्याने फायदा होतो. सामान्य नागरिकांना घर खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळते तसेच बांधकाम व्यावसायिक, घरकुल विकासक, रिअल इस्टेटमध्ये काम करणारे मध्यस्थ, वकील व सल्लागार आणि स्थावर मालमत्ता धारकांच्या व्यवसायाला चालना मिळते.
हेही वाचा - Police Recruitment 2023: परीक्षेची तयारी झाली का?; पोलीस शिपाई भरतीसाठी उद्या लेखी परीक्षा