मुंबई -अँटिलिया प्रकरणात उत्तर भारतातील कुख्यात गुंड सुभाषसिंग ठाकूर याचे नाव पुढे आले आहे. यावर अँटिलिया जिलेटिन प्रकरणात आपला कोणताही प्रकारचा सहभाग नाही आणि आपण टेलिग्राम संदेश पाठविला नसल्याचे स्पष्टीकरण सुभाषसिंग ठाकूर याने आपल्या वकिलामार्फत प्रेस नोट जारी करून दिले आहे. ठाकूर यांचे वाराणसीतील वकील जालंदर राय यांच्या मार्फत मुंबईतील त्याचे वकील के.एम. त्रिपाठी यांनी ही प्रेस नोट जारी केली.
हेही वाचा -जेष्ठ अभिनेत्री शशिकला जवळकर यांचे निधन
काय आहे प्रकरण?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एका स्कॉर्पिओ वाहनात जेव्हा जिलेटिनच्या कांड्या मिळाल्या, तेव्हा या प्रकरणात जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेचे नाव समोर आले होते. धमकीचे पत्र याच संघटनेने ठेवल्याची माहिती देखील समोर आली होती. हे पत्र यूएई (युनायटेड अरब अमिरात) येथून पाठवल्याची माहिती मिळाली. मात्र, नंतर एक माहिती समोर आली की, तिहाड कारागृहात एका तहसीन नावाच्या दहशतवाद्यामार्फत हे धमकीचे पत्र पाठवण्यात आले. मग या सगळ्या प्रकरणात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याचे नाव समोर आले. मात्र, ठाकूर याच्या वकिलाने एक प्रेस नोट जारी करत ठाकूरचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. वकिलाकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले की, सचिन वाझे आणि सुभाषसिंग ठाकूर यांची कोणतीही भेट झाली नाही. तसेच, तहसीन नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नसल्याचे वकिलाकडून स्पष्ट करण्यात आले.