मुंबई -राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही, असे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. नवी दिल्लीत काल (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तर यासोबतच याबाबत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्याबाबत टीका केली होती.
काय म्हणाले होते नवाब मलिक?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांचा तीन दिवसाचा दौरा जाहीर केला असून या दौऱ्यावर कॅबिनेटमध्ये जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना, 'राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत', असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. राज्यपाल हे उत्तराखंड राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देखील होते. त्यामुळे अजूनही राज्यपालांना मुख्यमंत्री असल्याचे भास होत असल्याचा टोलाही यावेळी नवाब मलिक यांनी राज्यपालांना लगावला.
अंजली दमानियांची प्रतिक्रिया काय? -
याबाबत अंजली दमानिया यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, जसे मिलिटरी हल्ला attack /retreat करतांना कव्हर फायर (Cover fire) देतात तोच प्रकार आपण आज पाहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त पवार-शाह भेटीला एक कव्हर अप (cover up) करण्यासाठी आणि बहुतेक शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजप विरुद्धच आहोत. मात्र, राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही, असेही पवार-शाह यांच्या भेटीनंतर अंजली दमानिया म्हणाल्या.