मुंबई - राज्यातील लॉकडाऊन नियम व अटींसह 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. देशात कोरोना बाधितांची आणि कोरोना बळींची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असली तरी निर्बंध लागू केल्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या ही उल्लेखनीय प्रमाणात खाली आली आहे. निर्बंध लागण्यापूर्वी महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या सात लाखांवर होती. निर्बंध लागल्यानंतर ही संख्या चार लाख 75 हजारांपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे हे निर्बंध सुरुच ठेवावे, अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांनी केलेली होती. त्यानुसारच हा निर्बंधांचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. मुंबईला दूध पुरवठा हा सुरळीत आहे. दूध पुरवठ्याबाबत अजून कोणतीही समस्या अजून उद्भवलेली नाही, अशी प्रतिक्रिया दूध विक्रेत्यांनी दिली आहे. तर मुंबईमध्ये अजूनही काही भागांमध्ये लोकांची गर्दी ही पाहायला मिळत आहे.
"ब्रेक द चैन" नियमावलीनुसार राज्य सरकारने 31 मेपर्यंत राज्यातील लॉकडाऊन हा नियम व अटींसह वाढवलेला आहे. एकीकडे मुंबईमध्ये या वाढवलेल्या लॉकडाऊन विरोधात असंतोष आहे. तर काही लोक लॉकडाऊन वाढल्यामुळे समाधानी आहेत, अशी स्थिती सध्या मुंबई परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. मुंबईमध्ये दररोज 40 लाख लीटर दुधाची आयात होत असते. त्यामुळे मुंबईला खूप मोठ्या प्रमाणात दुधाचा पुरवठा होत असतो. त्यामुळे या लॉकडाऊनच्या कडक निर्बंधांमुळे दुधाचा व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. दूध व्यवसाय सुरळीतपणे सुरू आहे. या कडक निर्बंधांचा या व्यवसायवरती कोणताही परिणाम झालेला नाही, अशी काहीशी परिस्थिती मुंबई परिसरात पाहायला मिळत आहे.