मुंबई- विद्याविहार आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान रविवारी सांयकाळी ९ वाजता रेल्वे रुळावरून लोकल गाडी घसरली होती. त्यानंतर डब्यातून धुर निघू लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यानंतर सीएसटीकडे जाणारी लोकल सेवा बंद करण्यात आली होती. परंतु, या घटनेचा सोमवारी लोकल अथवा एक्सप्रेस गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मध्य रेल्वेचे डी. आर. एम. संजय कुमार जैन यांनी सांगितले.
घटनेनंतर रेल्वे अभियांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. लोकलचे चाक रुळावर रात्री १२ वाजता बसवून ही लोकल कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ वर उभी करण्यात आली आहे. मात्र, दुरुस्तीसाठी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे विस्कळीत झाली होती. रेल्वे रुळावरून उतरलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवाशांनी उड्या टाकून कुर्ला रेल्वे स्थानकाकडे पायी चालत जात होते. या नंतर रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.