मुंबई Nana Patole On Congress Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत झाली. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युलावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर दिलंय.
जागा वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा नाही : काँग्रेस पक्षाची राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो न्याय यात्रा' शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रात येत आहे, यावर चर्चा झाली असून, जागा वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, भगवान श्रीराम आमच्या आस्था आणि भावनेचा विषय आहे. कोणी काय बोलायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाच्याही भावनांना ठेस लागू नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरू झाली आहे. यावर बोलताना पटोले म्हणाले की, केंद्रातील भाजपा घाबरू लागली म्हणून अशा प्रकारची कारवाई करत आहे.
तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू : महाविकास आघाडी सरकार राज्यात कोसळल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेते भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडं महाविकास आघाडीत जागा वाटपावरून काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. तर महाविकास आघाडीत वंचितला घ्यायचं की नाही यावर देखील तिन्ही पक्षात एकमत होत असल्याचं दिसून येत आहे.
दिल्लीत झाली चर्चा : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत गुरुवारी दिल्लीत बैठक झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत राज्यातील, मुंबई शहरातील काँग्रेसच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. तसेच महाविकास आघाडीतील लोकसभा जागा वाटपाच्या फॉर्मुल्याबाबत प्राथमिक चर्चा देखील केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
हेही वाचा -
- पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या रामभूमीतून फोडणार लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ
- लोकसभा निवडणुकीचे वाजू लागले पडघम, शिवसेना शिंदे गटाचं ६ जानेवारीपासून शिवसंकल्प अभियान
- हिटलरच्या प्रचार यंत्रणेप्रमाणे भाजपाचं काम, शरद पवारांचा मोंदीवर हल्लाबोल