महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai corona zero death : दीड वर्षानंतर पहिल्यांदाच रविवारी मुंबईत कोरोनामुळे एकही मृत्यूची नोंद नाही - no death mumbai corona

आज राज्यात 1715 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 91 हजार 697 वर पोहचला आहे. तर आज 29 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 789 वर पोहचला आहे. आज 2 हजार 680 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 91 हजार 697 वर पोहचला आहे.

mumbai corona update
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : Oct 17, 2021, 8:47 PM IST

मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पहिल्यांदाच आज मुंबईत एकही मृत्यू झाला नाही. 26 मार्चनंतर आज पहिल्यांदा 0 मृत्यूची नोंद करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मानले पालिका कर्मचाऱ्यांचे आणि माध्यमांचे आभार मानले. तसेच मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी पालिका प्रशासन सतत प्रयत्न करत आहे. पालिकेच्या या प्रयत्नांना यश आले आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असताना आज गेल्या दीड वर्षानंतर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी प्रशासनाचे आभार मानले असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईकरांनी साथ द्यावी, असे आवाहन केले आहे.

दीड वर्षाने शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईत गेल्या वर्षी 11 मार्चला पहिला रुग्ण आढळून आला. 17 मार्चला मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत गेल्या दीड वर्षात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असताना रोज 80 ते 90 मृत्यूची नोंद होत होती. कोरोनाचा प्रसार आटोक्यात असल्याने सध्या 2 ते 6 मृत्यूची दररोज नोंद होत आहे. आतापर्यंत गेल्या दीड वर्षात 16 हजार 180 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी 20 मार्च 2020 ला मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांमुळे तब्बल दीड वर्षांनी आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा -आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा गोंधळ, सकाळी एका तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्र

मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करा -

मुंबईत दीड वर्षांनी शून्य मृत्यूची नोंद झाल्याने ही मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीसाठी मी सलाम करतो. महापालिकेला दिलेला पाठिंबा आणि प्रशासनावर ठेवलेल्या विश्वासासाठी टीम मिडियाचे मनापासून आभार मानतो. आपण सर्वांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क लावावे. मुंबईतील प्रत्येक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला मदत करावी असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे.

16 हजार 180 मृत्यू -

मुंबईत मार्च 2020 पासून गेल्या दीड वर्षात 7 लाख 50 हजार 808 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामधील 7 लाख 27 हजार 84 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. 16 हजार 180 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 5 हजार 30 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1214 दिवस आहे. मुंबईत झोपडपट्टी विभागात रुग्ण आढळून येत नसल्याने एकही झोपडपट्टी कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली नाही. कोरोना रुग्ण आढळून आल्याने 50 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन गेले काही दिवस 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात घट होऊन 11 ऑक्टोबरला 1736, 16 ऑक्टोबरला 1553 तर आज 17 ऑक्टोबरला 1715 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 29 मृत्यूंची नोंद झाली असून 2 हजार 680 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.39 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details