मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्य विधिमंडळात पोलीस कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी मुंबईत सुमारे 10,000 पोलिसांची कमतरता असल्याचे म्हटले आहे.
मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता : विधानपरिषदेत दिलेल्या निवेदनात गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून (MSSC) 3,000 पोलीस कर्मचारी मागवले आहेत. ते म्हणाले की, मुंबई पोलीस दलात सुमारे 10,000 कर्मचार्यांची कमतरता आहे. या कमतरतेमुळे देशाच्या आर्थिक राजधानीचे पुरेसे संरक्षण करणे शक्य नाही. कोठेही पोलीस कर्मचारी कंत्राटावर घेतले जात नाहीत. त्यामुळे ते महाराष्ट्रातही घेतले जाणार नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी आधी विधानसभेत सांगितले होते.
'ही पोलिसांची कंत्राटी नियुक्ती नाही' : विधानपरिषदेत निवेदन देताना फडणवीस म्हणाले की, एमएसएससीकडून मागवण्यात आलेले 3,000 कर्मचारी सुरक्षा, गार्डशी संबंधित कामे आणि इतर कामांसाठी वापरले जातील. त्यांना तपास किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीशी संबंधित कोणतेही काम दिले जाणार नाही. ही पोलिसांची कंत्राटी नियुक्ती नाही. असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलिस कर्मचाऱ्यांची भरती केल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांच्या टीकेनंतर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.