मुंबई- भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे आज लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज दुपारी १२ नंतरच्या कालावधीत गडकरी-अहिर हे आपले उमेदवारी अर्ज सादर करतील. त्यासोबतच बीडमधून प्रीतम मुंडे, चंद्रपूरमधून हंसराज अहिर आणि सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी तर अकोल्यातून संजय धोत्रे आणि गडचिरोली-चिमुरमधून अशोक नेते हे भाजपचे सर्व उमेदवार आजच्याच मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
गडकरी-अहिर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा मुहूर्त साधणार - ASHOK NETE
गडकरी-अहिर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा मुहूर्त साधणार.. बीडमधून प्रीतम मुंडे तर सोलापुरात जय सिद्धेश्वर स्वामीही आजच दाखल करणार उमेदवारी अर्ज... नागपुरात गडकरी सोबत मुख्यमंत्री तर बीडमध्ये रावसाहेब दानवे लावणार उपस्थिती
नागपूर लोकसभा मतदार संघातून नितीन गडकरी यांचा अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील अनेक आमदार आणि भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत. तर चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून हंसराज अहिर हे स्थानिक आमदार आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत जाऊन अर्ज भरणार आहेत. बीड लोकसभा मतदारसंघामधून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे याही अर्ज भरणार असून त्यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पशु व संवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्यासह महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे या उपस्थित राहणार आहेत.
सोलापूरमधून काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपने उभे केलेल्या जयसिध्देश्वर स्वामी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची जबाबदारी ही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे. देशमुख यांच्यासह स्वामी यांच्या उमेदवारी अर्ज भरताना पालकमंत्री विजय देशमुख, रणजितसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
गडचिरोली-चिमूर या मतदार संघातून अर्ज भरताना अशोक नेते व अकोला लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरताना खासदार संजय धोत्रे यांना मात्र स्थानिक नेते, आमदार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे.