मुंबई :कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या कथित आत्महत्येने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. देसाई 2 ऑगस्ट रोजी कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले होते. त्यांनी आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'ते सर्व कर्जाची परतफेड करणार होते' : या प्रकरणी बोलताना नितीन देसाई यांची मुलगी मानसीने मोठा खुलासा केला. 'माझ्या वडिलांनी एका कंपनीकडून 181 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी त्यापैकी 86.31 कोटी रुपयांची परतफेड केली होती', असे तिने सांगितले. मात्र माझ्या वडिलांचा कोणाचीही फसवणूक करण्याचा हेतू नव्हता, असे ती म्हणाली. 'त्यांनी वचन दिलेले सर्व पेमेंट ते करणार होते. संबंधितांनी सहा महिन्यांच्या व्याजाची मागणी केली होती, जे माझ्या वडिलांनी त्यांचे पवईचे कार्यालय विकून फेडले होते. कोणाचीही फसवणूक करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. ते त्यांच्यावरील सर्व कर्जाची परतफेड करणार होते', असे मानसीने सांगितले.
'कर्ज देणाऱ्या कंपनीने खोटे आश्वासन दिले' : मानसीने दावा केला की, कर्ज देणाऱ्या कंपनीने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करताना त्यांना खोटे आश्वासन दिले. 'कोरोनाच्या साथीमुळे उद्योग प्रभावित झाला होता. कोणतेही काम नसल्यामुळे स्टुडिओ बंद होता. त्यामुळे ते कर्जाची नियमित परतफेड करू शकले नाहीत. त्यानंतरही त्यांनी कर्ज देणाऱ्या कंपनीशी वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांना थोडी सवलत देण्यात यावी, जेणेकरून ते त्यांच्याकडे बाकी असलेली रक्कम भरू शकतील, अशी त्यांची मागणी होती. मात्र कंपनीने त्यांना खोटे आश्वासन दिले आणि कायदेशीर कार्यवाही सुरू केली', असा आरोप तिने केला.