नवी दिल्ली : नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घाटनावरुन प्रचंड वाद सुरू असून तब्बल 20 विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या इमारत उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यासह आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आोयगाची बैठक दिल्लीत होत आहे. राज्याच्या विकासासाठी आर्थिक नियोजन या बैठकीत करण्यात येते. मात्र या बैठकीवरही अनेक विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. विघ्नसंतोषी लोक सगळीकडे असून त्यांच्या राज्याच्या विकासाबाबत त्यांनी विचार करायला हवा असा टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला आहे.
या थीमवर होणार बैठकीत चर्चा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज NITI आयोगाची आठवी बैठक होणार आहे. 2047 पर्यंत देशाला विकसित देश बनवण्याच्या उद्देशाने आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. परिषद NITI आयोगाच्या बैठकीत सर्व मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि विविध केंद्रीय मंत्री यांचा समावेश आहे. NITI आयोग 27 मे 2023 रोजी 'विकसित भारत @ 2047: टीम इंडियाची भूमिका' या थीमवर आठव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक आयोजित करणार असल्याचे नीती आयोगाने दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या विषयावर होणार बैठकीत चर्चा :नीती आयोगाच्या दिवसभराच्या बैठकीत आठ प्रमुख विषयांवर चर्चा केली जाईल, यात विकसित भारत @ 2047 त्यानंतर एमएसएमईवर वर जोर, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, अनुपालन कमी करणे यांच्यासह महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि पोषण कौशल्य विकास, क्षेत्र विकास आणि सामाजिक पायाभूत सुविधांसाठी प्रेरक शक्ती यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.