मुंबई :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल नांदेड येथील जाहीर सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. अमित शहा यांच्या टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिल्यानंतर राऊतांच्या या उत्तराला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. राऊतांना उत्तर देताना नितेश राणे यांनी त्यांची हिंमत दाखवायाला सांगितली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे शिवडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा मोठा गैप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे.
खरा वाघ कोण आहे? : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये काय इज्जत राहिली आहे का ते त्यांनी पाहावे. पूर्वी जी काही इज्जत होती, ती फक्त बाळासाहेब ठाकरे असताना होती. परंतु त्यांच्या निधनानंतर मातोश्रीकडे कोणीही फिरकत नाही. हल्ली सर्व बैठका शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी होत आहेत. खरा वाघ कोण आहे, ते जनतेला माहीत आहे. मी फक्त म्याऊ म्याऊ केले तरी यांना घाम फुटतो, असे सांगत नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत नाही : नितेश राणे म्हणाले आहेत की, अमित शहा यांनी उपस्थित केलेले जे मूळ मुद्दे आहेत त्याला उत्तर देण्याची हिंमत संजय राऊत यांच्याकडे नाही. हिंदुत्वाशी बेईमानी कोणी केली? कोणाचा राजकीय लव्ह जिहाद झाला आहे? यावर त्यांची बोलण्याची हिंमत नाही. ट्रिपल तलाकला हे पाठिंबा दिल्याचे म्हणत आहेत. परंतु सुप्रिया सुळेंनी ट्रिपल तलाक असायला पाहिजे, असे समर्थन दिले होते. समान नागरी कायदा आम्ही आणणारच, असे अमित शहा यांनी ठणकावून सांगितले आहे. परंतु यावर उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांच्याकडे उत्तर नाही. अयोध्यामधील राम मंदिरात जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अबू आझमी यांना घेऊन जाऊन तिथे महाआरती करण्याची हिमंत संजय राऊत यांच्यामध्ये आहे का? असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला.