मुंबईNitesh Rane on Manoj Jarange :मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यात आरक्षणाचा लढा तीव्र केला आहे. अशातच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना मराठे उघडं पाडणार असल्याचं वक्तव्य करून नवा वाद सुरू केला आहे. यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना गंभीर इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केल्यास गाठ मराठ्यांशी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा :राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपत आहे. दुसरीकडं राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, तसंच ओबीसी नेता मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. त्यातच जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानं नवा वाद सुरू झाला आहे.
देवेंद्र फडवणीस यांना उघडे पाडणार :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर आंदोलनं करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. मनोज जरांगे पाटील दादागिरीची भाषा करत असून त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, असं छगन भुजबळ यांनी म्हटंल आहे. तसंच काल पुण्यातील इंदापुरात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर काही मराठा आंदोलकांनी चपला फेकल्यानं वातावरण आणखी तापलं आहे. अशातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज देवेंद्र फडणवीस यांचा पर्दाफाश करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळं जरांगे यांना फडणवीसांबद्दलच्या वक्तव्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी इशारा दिला आहे.
काय म्हणाले नितेश राणे? :देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यात विष कोण घालतंय? तुमचं भाषण कोण लिहितंय? मुस्लीम आरक्षणाची भाषा तुमच्या तोंडात कशी?, याची पुराव्यासह यादी काढवी लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांना नितेश राणे यांनी दिला आहे. तुम्ही मराठा आरक्षणाबाबत बोलत असाल, तर आम्ही तुमचं स्वागत करू. पण, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतल्यास तुमची मराठ्यांशी गाठ आहे, हे लक्षात ठेवा, अशा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
हेही वाचा -
- कांद्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी घेतली पियुष गोयल यांची भेट
- भिडे वाड्याच्या जागेवर उभी राहणार शाळा; छगन भुजबळ यांची माहिती
- लोकसभा निवडणुकीपूर्वी बॉम्बस्फोट न करता भाजप निवडणुका कशा जिंकणार? - संजय राऊत