महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापौर बंगल्यात उद्धव ठाकरे आणि आयुक्तांमध्ये बेस्ट ऐवजी योगा, डाएटवर चर्चा - नितेश राणे - Nitesh Rane

स्ट कृती समिती कामगारांचे प्रश्न मांडत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पालिका आयुक्त अजोय मेहता हे मात्र, योगाची कोणती आसने करावीत आणि कोणता डाएट घ्यावा, यावर चर्चा करत होते. असा गौफ्यस्फोट नितेश राणेंनी केला.

नितेश राणे

By

Published : Feb 10, 2019, 3:04 PM IST

मुंबई- बेस्टचा संप ९ दिवस सुरू होता. या संपादरम्यान महापौर बंगल्यावर ७ तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान बेस्ट कृती समिती कामगारांचे प्रश्न मांडत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पालिका आयुक्त अजोय मेहता हे मात्र, योगाची कोणती आसने करावीत आणि कोणता डाएट घ्यावा, यावर चर्चा करत होते. असा गौफ्यस्फोट करत यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.

बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कृती समितीने नऊ दिवस संप केला. या संपाला विविध संघटना आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला. परेलच्या बेस्ट वसाहतीत हळदी कुंकू समारंभादरम्यान कामगार नेते शशांक राव, आमदार नितेश राणे, मनसेचे संदिप देशपांडे आदी मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभावेळी नितेश राणे बोलत होते.

यावेळी बोलताना महापौर बंगल्यावर बेस्ट संपाबाबत आयोजित बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्तांकडून योगाची आसने, कोणता डाएट घ्यावा, यावर चर्चा झाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांबाबत हे गंभीर नसल्याचे राणे यांनी सांगितले. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत यांची सत्ता आहे. मग यांना बेस्ट कामगारांचा प्रश्न का सोडवता आला नाही, असा थेट सवालही राणे यांनी केला.

संपादरम्यान, बेस्ट कामगारांना सेवा निवासस्थाने खाली करण्याच्या नोटीस देण्यात आल्या. बेस्टमधील मराठी कामगारांना घराबाहेर काढून त्यांचा गिरणी कामगार करण्याचा डाव असल्याचा आरोप राणे यांनी केला. एकीकडे मराठी कामगाराला घराबाहेर काढले जात असताना यांची दुसरी मातोश्री उभी राहत आहे. यावरून सुवर्ण दिवस कोणाचे आले याचा विचार करावा, असेही राणे म्हणाले.

बेस्ट कामगारांची सेवा निवासस्थाने रिक्त करण्यासाठी नोटीस देणाऱ्या अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी बिल्डरांकडे थकीत असलेल्या ३२० कोटी रुपयांची वसुली करण्यातही मर्दांनगी दाखवावी, असे आवाहन राणे यांनी केले. नारायण राणे बेस्ट समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी कामगारांना आपलेसे केले. आज राणे कुटुंबाची जी काही ओळख आहे ती बेस्ट कामगारांमुळेच आहे. यामुळे जेव्हा कधी हाक माराल, तेव्हा मी तेथे उपस्थित असेन, असे आश्वासन नितेश राणे यांनी यावेळी दिले.

एकजूट कायम ठेवा - शशांक राव

संप सुरू करणे सोपे, मात्र, तो मागे घेणे अवघड असते. बेस्ट संपादरम्यान कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची आणि महिलांची साथ मिळाली. यामुळेच जिद्द वाढल्याने संप यशस्वी झाल्याचे कामागर नेते शशांक राव म्हणाले. वर्षातून १५० दिवस डेपोला भेट देणार असून कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ३ महिन्यातून एकदा बेस्ट वसाहतीला भेट देणार असल्याचे राव यांनी सांगितले. न्यायालयाने मध्यस्थांची नेमणूक केली आहे. त्यांच्या पुढे आपले प्रश्न मांडले आहेत. यामुळे सव्वा वर्षांपर्यंत अर्थसंकल्पाचे जे विलीनीकरण झाले नाही, ते लवकरच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अस्तित्वाची लढाई अजून संपली नसल्याने एकजूट कायम ठेवली, तरच आपला विजय निश्चित असल्याचे राव यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details